लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगावात भावपूर्ण आदरांजली
लातूरच्या बाभळगावातील विलासबाग येथे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. देशमुख कुटुंबीयांसह राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती आणि ‘संतवाणी’ कार्यक्रमाचे आयोजन झाले.
तस्वीर में बाभळगाव स्थित विलासबाग में स्मृति स्थल के सामने देशमुख परिवार के सदस्य, जनप्रतिनिधि और अधिकारी सामूहिक रूप से खड़े नजर आ रहे हैं।
लातूर, दि. १४ ऑगस्ट : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली. देशमुख कुटुंबीयांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्नेही, हितचिंतक आणि विलासराव देशमुख यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना अभिवादन केले.
स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ वाजता विलासबाग येथे गायिका सौ. वंदना कांबळे यांच्या सादरीकरणातून ‘संतवाणी’ कार्यक्रम झाला. यानिमित्त लातूरसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले.
विलासराव देशमुख यांनी आधुनिक विचार, दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण ठेवत महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण मानले जाते.
विकासाला गती देतानाच सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवणारे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी प्रेरणादायी ठरले. लोकसेवा, विकास आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आजही जनमानसात जिवंत आहेत. त्यांच्या विचारांचा आणि लोकसेवेचा वारसा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न देशमुख कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू आहे.
विलासबाग येथे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळास माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, विलास साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, विनायकराव पाटील, शहाजी पाटील, अभिजीत देशमुख आणि डॉ. सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवरांनी विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथे आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आपल्या नेत्याबद्दलचा जिव्हाळा आणि आदर स्पष्टपणे जाणवत होता. ‘विलासराव’ हे केवळ नाव नव्हते, तर विकासाची दृष्टी, लोकांशी असलेले नाते आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास होता, अशा भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमास सभापती जगदीश बावणे, अशोक गोविंदपूरकर, लक्ष्मण मोरे, ॲड. समद पटेल, यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, प्रवीण पाटील, अनंत देशमुख, संतोष देशमुख, अविनाश देशमुख, ललितभाई शहा, विजय देशमुख, कैलास पाटील, अनिल पाटील, गणपतराव बाजुळगे, ॲड. दीपक सुळ, अमर खानापूरे, ॲड. दीपक राठोड, अमर राजपूत, गोविंद देशमुख, ॲड. फारुख शेख, डॉ. दिनेश नवगिरे, संभाजी सुळ, सुनील पडिले, डॉ. अजय जाधव, युवराज जाधव, संतोष सोमवंशी, गोविंद डुरे पाटील, कल्याण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते विलासराव देशमुख यांचे कार्य, विचार आणि लोकसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावपूर्ण वातावरणात बाभळगाव येथील स्मृतिदिनाचा कार्यक्रम पार पडला.