गेल्या महिनाभरापासून शाळकरी मुलींच्या मागे लागून त्यांचा पाठलाग करणे तसेच हातवारे करून त्रास दिल्याच्या आरोपावरून कागल तालुक्यातील बोळावीवाडी येथील अथर्व उत्तम येजरे (वय २०) याच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोळावी येथील विद्यामंदिर परिसरात तसेच बोळावी एसटी स्टँड ते ठाणेवाडी, ता. कागल येथील एसटी स्टँडदरम्यान अथर्व येजरे हा मोटारसायकलवरून शाळेत ये-जा करणाऱ्या पीडित मुली व तिच्या मैत्रिणींचा वारंवार पाठलाग करीत होता. तसेच त्यांच्याकडे हातवारे करून त्रास देत असल्याचा आरोप आहे.

या प्रकाराबाबत पीडित मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी मुरगूड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अथर्व उत्तम येजरे याच्याविरुद्ध बालकांना लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ मधील कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अथर्व येजरे याला अटक केली. त्याला प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले करीत आहेत.

Tags: