जालना: हिरकणी महोत्सवात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

जालना येथे आयोजित हिरकणी महोत्सवात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला, विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

Update: 2026-07-01 14:36 GMT

जालना येथे आयोजित हिरकणी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल दीपप्रज्वलन करताना.

जालना: "महिलांना एकत्र आणणे हे आव्हानात्मक काम असले, तरी त्या संघटित झाल्यानंतर समाजपरिवर्तनाची नवी क्रांती घडू शकते. महिलांनी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास घडविला असून, हाताच्या बोटांप्रमाणे वेगवेगळे असलेले विचार एकत्र आले की जशी शक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे महिलांची एकजूट ही समाजाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे," असे प्रतिपादन जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 'हिरकणी महोत्सवा'च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, 'माय भारत'चे जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे, शाहीर आप्पासाहेब उगले, संगीता ढेरे, संस्थेच्या अध्यक्षा तथा महोत्सवाच्या आयोजिका करुणाताई अच्युत मोरे, राष्ट्रमाता करिअर अकॅडमीच्या संचालिका चंदाताई अनिलकुमार धारे आणि अच्युत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी या महोत्सवात दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शासकीय योजनांची माहिती, अर्जांचे मोफत वितरण, महिला सक्षमीकरणविषयक जनजागृती, एकल महिलांसाठीच्या योजनांची माहिती, महिला व बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष कार्यशाळा, जादूच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोनाची जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर, महिला कर्मचाऱ्यांसाठी 'पॉश' (POSH) कायद्याविषयी कार्यशाळा आणि महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महोत्सवाच्या निमित्ताने समाजकारण, कायदा, लोककला, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 'हिरकणी पुरस्कार' देऊन करण्यात आला. पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये मुंबईच्या विदुला जगताप, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या जालना येथील प्रज्ञा रंगनाथ खरात, पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत ॲड. सोनाली कांबळे, छत्रपती संभाजीनगरच्या स्वाती म्हैत्रे, अमरावतीच्या माधुरी चव्हाण, धुळ्याच्या मंगला मोरे आणि मुंबईच्या प्रज्ञा पितळे यांचा समावेश होता.

याचबरोबर, बालक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान देणारे पत्रकार अक्षय शिंदे आणि डॉ. सचिदानंद तौर यांना 'सेवा गौरव पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महोत्सवात शाहीर रामानंद उगले, शाहीर आप्पासाहेब उगले आणि त्यांच्या संचाने लोककला, पोवाडे व प्रबोधनपर सादरीकरण केले. महोत्सवातील भाग्यवान महिलांना सोडत पद्धतीने पैठणी साड्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता कोल्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाहीर आप्पासाहेब उगले यांनी केले. महिला सक्षमीकरण, आरोग्य, रोजगार आणि सांस्कृतिक जतन यांचा संगम घडवून आणणारा हा महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाला.

Tags:    

Similar News