तस्वीर में तन्वी गुंडेश मगदूम गले में कांस्य पदक पहने और हाथ में पदक तथा विक्ट्री साइन दिखाते हुए नजर आ रही हैं।

कोल्हापूर : विजय मोरबाळे

मुरगूडच्या तन्वी गुंडेश मगदूम हिने जिद्द, मेहनत आणि कठोर प्रशिक्षणाच्या जोरावर जागतिक कुस्तीच्या आखाड्यात दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. स्लोव्हाकिया येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगूडच्या तन्वीने ५७ किलो वजनगटात कांस्यपदकाला गवसणी घालत भारतासह मुरगूडचा नावलौकिक उंचावला.

जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तन्वीने आत्मविश्वास, आक्रमक कुस्ती आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने मिळविलेले कांस्यपदक तिच्या अथक परिश्रमांचे आणि जिद्दीचे फलित ठरले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूने जागतिक व्यासपीठावर मिळविलेले हे यश परिसरातील युवा तसेच महिला कुस्तीपटूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

तन्वीच्या पदकविजयी कामगिरीबद्दल संकुलाचे प्रमुख खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष अॅड. विरेंद्र भैय्या मंडलिक, SAI चे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, माजी सहआयुक्त, उत्पादन शुल्क विभाग सुनील चव्हाण आणि डॉ. प्रशांत अथनी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तन्वीला जागतिक स्पर्धेसाठी घडविण्यात संकुलाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादासो लवटे आणि दयानंद खतकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तन्वीने कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मेहनत घेतली. या प्रशिक्षणाच्या बळावरच तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत पदकावर आपले नाव कोरले.

तन्वीच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि तिच्या अथक मेहनतीसोबतच रुबिक्स फाउंडेशनचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. तन्वीला आवश्यक सहकार्य केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादासो लवटे यांनी रुबिक्स फाउंडेशनचे विशेष आभार मानले.

तन्वीच्या या यशामुळे मुरगूडच्या कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या कांस्यपदकामुळे परिसरातील नवोदित महिला कुस्तीपटूंना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून, जिद्द, मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य यांच्या बळावर जागतिक पातळीवर यश संपादन करता येते, हे तन्वीने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

Tags: