त-हाडी येथील स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या दराने थेट ७० रुपयांचा टप्पा ओलांडला असून, किरकोळ बाजारात साखरेचा भाव प्रति किलो ७४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या २० दिवसांत साखरेच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवाढीचा हा वेग कायम राहिल्यास आगामी काळात साखरेचा भाव ८० रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईमुळे आधीच कौटुंबिक अर्थकारण बिघडले असताना, दैनंदिन वापरातील साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दर नियंत्रणात न राहिल्यास यंदाच्या सणांची गोडी महाग पडण्याची धास्ती व्यक्त होत आहे.

साखरेच्या दरवाढीचा थेट फटका चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स, मिठाई आणि बेकरी व्यावसायिकांनाही बसत आहे. दूध, गॅस आणि चहा पावडरच्या वाढलेल्या दरात आता साखरेची भर पडल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, भविष्यात चहा आणि खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

साखरेपाठोपाठ गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १ ऑगस्ट रोजी किरकोळ विक्रीत गूळ ६० रुपये किलो विकला जात होता. मागील २० दिवसांत गुळाच्या दरात १४ रुपयांनी वाढ झाली असून, गुरुवारी तो ७४ रुपये किलोने विकला जात होता.

साखरेच्या या ‘कडू’ दरवाढीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने बाजारातील दरांची तपासणी करून साठवणुकीवर आणि दरांवर नियंत्रण मिळवावे, अशी जोरदार मागणी त-हाडी परिसरातील नागरिक आणि ग्राहकांकडून केली जात आहे. सणासुदीच्या काळात साखरेची वाढणारी मागणी आणि त्यापूर्वीच ७४ रुपयांवर पोहोचलेला किरकोळ दर यामुळे ग्राहकांच्या खर्चावर वाढता दबाव निर्माण झाला आहे.

Tags: