लातूर के गांधी चौक थाना पुलिस ने 27 अगस्त को ट्रक चालक से चाकू की नोक पर लूटपाट करने वाले दो आरोपियों को 24 घंटे के भीतर गिरफ्तार कर माल बरामद किया।

लातूरमध्ये भरदिवसा ट्रक अडवून चालकाच्या कॅबिनमध्ये घुसत चाकू, स्क्रू ड्रायव्हर आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून २० हजार रुपये रोख व मोबाईल लुटणाऱ्या तिघांपैकी दोन आरोपींना गांधी चौक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून लुटीतील रोख रक्कम, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चाकू असा सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास इरफान फारुख पटेल (वय ३४, रा. चिंचोली सायखान, ता. निलंगा, ह.मु. टाके नगर, लातूर) हे शाहू ज्युनिअर कॉलेज ते स्क्रॅप मार्केटकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर ट्रक घेऊन थांबले होते. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून थेट ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला.

तिघांनी पटेल यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चालक घाबरून गेला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील २० हजार रुपये रोख आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पसार झाले.

घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६०३/२०२६, कलम ३०९(४), ३०९(६), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी डी.बी. पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

डी.बी. पथकाने घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध माहिती, तांत्रिक तपास आणि विविध बाबींच्या आधारे आरोपींचा कसून शोध सुरू केला. तपासात यशपाल डिगांबर औटे (२०), देवेंद्र शिवराम सलगर (२५) आणि योगेश चंद्रकांत लोखंडे (३४) या तिघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांनी सापळा रचून २९ ऑगस्टच्या मध्यरात्री यशपाल औटे आणि देवेंद्र सलगर यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपींकडून फिर्यादीची रोख रक्कम व मोबाईल असा सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल, तसेच गुन्ह्यात वापरलेली अंदाजे ६० हजार रुपये किमतीची यामाहा एफ.झेड. मोटारसायकल आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी योगेश लोखंडे फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या सूचनेनुसार पोउपनि प्रमोद देशमुख, सफौ राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले आणि गोविंद राऊत यांच्या पथकाने केली.

भरदिवसा रस्त्यावर ट्रक अडवून चालकाला लुटण्याच्या घटनेने निर्माण झालेली भीती पोलिसांच्या जलद कारवाईने काही अंशी दूर झाली असून, गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवणारी ही कारवाई ठरली आहे.

Tags: