हिंगणघाट: लावारिस पशुओं के आतंक पर शिवसेना (UBT) ने नगर परिषद को सौंपा ज्ञापन
शहर में घूम रहे मवेशियों और कुत्तों से हादसों का खतरा बढ़ने पर शिवसेना (UBT) ने नगर परिषद से कार्रवाई और विशेष दस्ते के गठन की मांग की।
तस्वीर में हिंगणघाट नगरपरिषद कार्यालय में अधिकारी को ज्ञापन सौंपते शिवसेना (UBT) प्रतिनिधि दिख रहे हैं।
हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि विविध प्रभागांमध्ये मोकाट श्वान, गायी, वळू तसेच इतर मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हिंगणघाट नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोकाट श्वान, गायी आणि वळू यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
सौ. सारिका प्रकाश अनासाने, नगरसेविका, सौ. राजश्री देवडे, नगरसेविका, माजी नगरसेविका सौ. नीता धोबे, सौ. करूणाताई वाटकर तसेच शहर प्रमुख श्री. सचिन पोटदुखे यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील रस्त्यांवर अचानक येणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
नगरपरिषदेने यापूर्वी मोकाट श्वान आणि बेवारस जनावरांच्या बंदोबस्तासाठी नियोजन व ठराव केले असल्यास त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्यक्षात दिसून आली नाही, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. केवळ कागदोपत्री नियोजन न करता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्यक्ष आणि सातत्यपूर्ण कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील सर्व प्रमुख मार्ग, चौक आणि प्रभागांमध्ये सर्वेक्षण करून मोकाट श्वानांची पकड मोहीम राबवावी, त्यांचे निर्बीजिकरण व लसीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. मोकाट गायी, वळू आणि इतर जनावरांसाठी नियमानुसार पकड मोहीम राबवून त्यांची सुरक्षित व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मंदिर परिसर आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी विशेष पथक नियुक्त करावे, असे निवेदनात नमूद आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या ठराव आणि नियोजनाच्या अंमलबजावणीची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी करण्यात आली.
एखाद्या व्यक्तीचा बेवारस जनावरांच्या दंशाने किंवा शिंग मारल्याने मृत्यू झाल्यास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या नावाने गुन्हा नोंदविला पाहिजे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या विषयावर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्यास पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना सर्वश्री सुनील आष्टीकर, शितल चौधरी, दिलीप चौधरी, प्रमोद एडलावर, दिनेश धोबे, हिरामण आवारी, पप्पू घवघवे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.