शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम काही कर्जदारांच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात झाली असतानाच, नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मात्र अद्याप रखडले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, मात्र वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने जाहीर केलेले हे अनुदान प्रत्यक्षात कधी मिळणार, की केवळ घोषणेपुरतेच मर्यादित राहणार, असा सवाल करत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदानाची रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे सचिन हंचनाळे यांनी केली आहे. याबाबत येत्या पंधरा दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास सहायक निबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

दुष्काळी परिस्थिती, शेतीसाठी वाढत चाललेला उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा अपुरा बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने घोषित केलेले प्रोत्साहन अनुदान तातडीने वितरित करणे आवश्यक असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. केवळ ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मर्यादित न ठेवता ती वाढवून एक लाख रुपये करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीतही मोठ्या संख्येने शेतकरी अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. पोर्टलवर ३१ लाख १७ हजार थकीत कर्जखात्यांची माहिती प्राप्त झाली असून, पहिल्या तीन टप्प्यांत सुमारे २४ लाख ७६ हजार शेतकरी पात्र ठरल्याची माहिती आहे. यापैकी १५ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

दुसरीकडे, सुमारे दीड लाख शेतकरी आर्थिक निकषांमुळे अपात्र ठरले असून, जवळपास पाच लाख शेतकरी विविध निकषांच्या पडताळणी प्रक्रियेत अडकले आहेत. योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार, दुसऱ्या टप्प्यात चार लाख २० हजार आणि तिसऱ्या टप्प्यात तीन लाख २१ हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर होऊनही प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. एकीकडे थकीत कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे कर्जमाफीबरोबरच प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदानही विनाविलंब वितरित करण्याची मागणी जोर धरत आहे.

शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तातडीने जमा करावे आणि अनुदानाची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. येत्या पंधरा दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास सहायक निबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार संघटनेने केला आहे.

Tags: