तस्वीर में बाएं से मनोज राजपूत शेतकरी आणि दाएं योगेंद्र सिसोदिया दिसत आहेत.

शिरपूर प्रतिनिधी : पिंप्री शिवारात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल अकरा ते बारा बोअरवेलच्या विद्युत केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच रात्री अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीला गेल्याने परिसरातील शेतकरी वर्गात चिंता आणि संतापाचे वातावरण आहे.

या चोरीचा फटका रोहित काशिनाथ गिरासे, एकनाथसिंग ठाणसिंग गिरासे, नागोसिंग इद्रसिंग गिरासे, महेंद्रसिंग भगवानसिंग गिरासे, इद्रसिंग हिरामण गिरासे, कोमलसिंग उत्तमसिंग राजपूत, संग्रामसिंग भीमसिंग गिरासे, राजेंद्र उत्तम राजपूत, योगेंद्रसिंग एकनाथसिंग सिसोदिया, महेंद्रसिंग एकनाथसिंग सिसोदिया आणि इंदुबाई उमेशसिंग राजपूत या शेतकऱ्यांना बसला आहे.

बोअरवेलच्या केबल चोरीमुळे शेतातील सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. केबल नव्याने खरेदी करून बसविण्याचा अतिरिक्त आर्थिक भारही शेतकऱ्यांवर पडणार आहे.

घटनेची माहिती पोलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी थाळनेर पोलीस ठाण्यास कळविली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शेतशिवारात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतशिवारात एकाच रात्री मोठ्या प्रमाणावर केबल चोरी होणे ही गंभीर बाब असून, या घटनांमागे संघटित टोळीचा सहभाग आहे का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे. पोलिसांनी परिसरातील संशयित हालचाली, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच यापूर्वीच्या चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.

शेतकरी मनोज राजपूत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अतीवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून केबल चोरी झाल्यामुळे नवीन तांब्याची केबल घेण्यासाठी सुमारे 1700 ते 1800 रुपये खर्च येतो. मोटार काढण्यासाठी चैनकप्पा ऑपरेटरची 2500 रुपये मजुरी आणि पिकांचे नुकसान वेगळे होते. वर्षाकाठी दोन ते तीन वेळा केबल चोरी होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा असून अशा चोरट्यांवर वचक असणे गरजेचे आहे.

शेतकरी योगेंद्र एकनाथसिंग सिसोदिया यांनीही आपली व्यथा व्यक्त केली. ते म्हणाले, दिवस-रात्र मेहनत करून पिकं उभी करतो, पण रात्रीच्या अंधारात चोरटे आमच्या बोअरवेलच्या केबलच घेऊन जातात. केबल चोरी म्हणजे केवळ तारांची चोरी नाही, तर आमच्या पिकांना पाणी देणारी जीवनवाहिनीच तोडली जाते. पुन्हा नवीन केबल घेण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो आणि तो भार आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पडतो. आमच्या कष्टाची आणि पिकांची सुरक्षा कोण करणार, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याला सतावत आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

पिंप्री शिवारातील या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेसह त्यांच्या आर्थिक अडचणींचाही प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांच्या तपासातून या केबल चोरीमागील चोरट्यांचा शोध लागतो का, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Tags: