पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवर राजकीय हालचालींना वेग, विक्रम काळेंची मोठी भूमिका
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फत्तेसिंह पवार यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. आमदार विक्रम काळे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.
तस्वीर में बाएं से फत्तेसिंह पवार और दाएं विक्रम काळे नजर आ रहे हैं।
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. ‘स्वराज्य शिक्षक संघा’चे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत विधान परिषदेतील छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान सदस्य विक्रम काळे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
दूरध्वनीवरील चर्चेदरम्यान शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गेल्या सुमारे २५ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या शिक्षक कार्यकर्त्याला विधान परिषदेत संधी मिळावी, अशी भूमिका विक्रम काळे यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. “शिक्षकांचे प्रश्न प्रत्यक्ष अनुभवलेला आणि शिक्षकांच्या व्यथा जाणणारा शिक्षकच ते प्रभावीपणे विधान परिषदेत मांडू शकतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
फत्तेसिंह पवार हे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर कार्यरत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. सेवा संरक्षण, संचमान्यता, वेतन व अनुदान, अर्धवेळ शिक्षकांचे प्रश्न, प्रशासकीय अडचणी तसेच शिक्षकांच्या सेवेशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केल्याचे ‘स्वराज्य शिक्षक संघा’कडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माध्यमातून फत्तेसिंह पवार यांना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका विक्रम काळे यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
“अजितदादांनी पाहिलेले शिक्षकांच्या प्रश्नांच्या निराकरणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार आहोत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या शिक्षक कार्यकर्त्याला संधी मिळावी, यासाठी माझ्या परीने प्रयत्न करणार,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगण्यात येते.
फत्तेसिंह पवार यांच्या संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव हा त्यांच्या संभाव्य उमेदवारीतील महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे. पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि लातूर आदी विभागांमध्ये ‘स्वराज्य शिक्षक संघा’च्या माध्यमातून शिक्षकांचे संघटन उभारण्याचे काम करण्यात आल्याचा दावा संघटनेकडून करण्यात येतो.
यापूर्वी फत्तेसिंह पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वराज्य शिक्षक संघा’च्या शिष्टमंडळाने बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिक्षकांचा सन्मान तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्याचे संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले होते.
या भेटीनंतर आता आमदार विक्रम काळे यांनी फत्तेसिंह पवार यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केल्याने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला वेग आला आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांच्या प्रश्नांशी दीर्घकाळ जोडलेला उमेदवार असावा, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. फत्तेसिंह पवार यांची संघटनात्मक पार्श्वभूमी, शिक्षक प्रश्नांसाठीचा दीर्घकाळाचा पाठपुरावा आणि विविध विभागांतील संपर्क या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य उमेदवारीकडे शिक्षक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आमदार विक्रम काळे यांची उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याची भूमिका, सुनेत्रा पवार यांच्याशी झालेली भेट आणि ‘स्वराज्य शिक्षक संघा’ची संघटनात्मक तयारी या घडामोडींनंतर आता अधिकृत उमेदवारीचा निर्णय काय होतो, याकडे शिक्षक मतदारसंघातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.