मासिक पाळीतील स्वच्छता; स्त्रिआरोग्याच्या नव्या बदलाची नांदी!
"मासिक पाळी" एक नैसर्गिक प्रक्रिया, पण अजूनही समाजात अनेकदा मौनाच्या पडद्याआड गेलेली एक संवेदनशील गोष्ट. मात्र नवी मुंबईच्या एमआयडीसी परिसरातील संभाजीनगर झोपडपट्टीत या मौनाला आवाज देण्याचं कार्य परानुभूती फाउंडेशनने यशस्वीपणे केलं. मासिक पाळी स्वच्छता आणि जागरूकतेसाठी राबवलेल्या या उपक्रमातून महिलांच्या आरोग्यावर फक्त प्रकाशच टाकला गेला नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासालाही नवा हातभार मिळाला. सामाजिक वर्ज्यांवर प्रश्नचिन्ह उभं करत, आरोग्यविषयक संवाद सुरू करण्याचा हा प्रयत्न केवळ आरोग्य मोहीम नव्हता, तर एका बदलाच्या प्रक्रियेला चालना देणारा सामाजिक क्रांतीचा सुरुवातीचा टप्पा होता. या बद्धल आपण अधिक जाणून घेऊयात ..
नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील संभाजीनगर आदिवासी झोपडपट्टीमध्ये परानुभूती फाउंडेशन ने घेतलेल्या मासिक पाळी स्वच्छता जागरूकता उपक्रमाने महिलांच्या आरोग्य क्षेत्रात नव्या बदलाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करणे नव्हता, तर मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता राखण्याचे महत्त्व पटवून देणे, शारीरिक-मानसिक बदलांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक वर्ज्यांवर प्रकाश टाकणे हा होता. या यशस्वी उपक्रमासाठी स्थानिक परिचारिका ज्योती लडाक यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांनी आयोजकांना आसरा दिला आणि कार्यक्रमासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली. या पुढाकारामुळे सुमारे ५०-६० महिलांनी एकत्र येऊन उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमात परानुभूती फाउंडेशनचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. भूषण जाधव , तसेच युनिचार्म कॉर्पोरेशन आणि बिर्ला सॉफ्ट यांच्या सहकार्य लाभले. त्याच सोबत परानुभूती फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या, महिला सशक्तिकरण कोच, सोशल इम्पॅक्ट अँबॅसिडर आणि गायिका ककुल मेहरा यांनी सखोल सादरीकरण केले. त्यामध्ये मासिक पाळीशी निगडित गैरसमज, मार्केट रिसर्च आणि आरोग्यविषयक उपाय यावर प्रकाश टाकण्यात आला.
महिलांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला, प्रश्न विचारले आणि अनुभव शेअर केले. अनेक महिलांना प्रथमच मासिक पाळीच्या काळातील आरोग्यविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती मिळाली. संसर्ग टाळण्यासाठी योग्य स्वच्छता पद्धती, स्वच्छतेच्या साधनांचा वापर आणि सामाजिक अडथळे न जुमानता आरोग्यावर मोकळा संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
उष्ण हवामान, वेळेची मर्यादा आणि अडथळ्यांवर मात करून परानुभूती फाउंडेशनने हा उपक्रम प्रभावीपणे राबवला. महिलांमध्ये संवाद, सहानुभूती आणि आपुलकीची भावना निर्माण झाली. या प्रेरणादायी उपक्रमासाठी परानुभूती फाउंडेशनने बिर्ला सॉफ्ट आणि आय-प्लेज यांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा उपक्रम केवळ एकदाच घडून गेलेली घटना नसून, भविष्यात अशा अनेक मोहिमा राबवण्याचा परानुभूती फाउंडेशनचा संकल्प आहे. मासिक पाळी विषयावर खुला संवाद, शाश्वत आरोग्य उपाय आणि सामाजिक बदलाच्या दिशेने ही एक आश्वासक नांदी ठरणार आहे. त्याच प्रमाणे परानुभूति फाऊंडेशनचे संस्थापक व जनरल फिजिशियन डॉ प्रवीण तळेले, यांनी लोकांना आवाहन केले आहे की परानुभूति फाउंडेशनच्या या व अनेक विविध उपक्रमांना उत्तम प्रतिसाद द्यावा.
Editorial

Editorial

Next Story