- साक्षी कुलकर्णी
सह्याद्रीच्या विशाल आणि अभेद्य डोंगररांगांमध्ये अनेक किल्ले वास्तव्य करत आहेत, ज्यामध्ये वास्तुकला, संरक्षणशास्त्र आणि इतिहास यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो. या किल्ल्यांमधील एक खास प्रकार म्हणजे जोड किल्ले – म्हणजे एकाच परिसरात एकमेकांजवळ असलेले, परस्परपूरक स्वरूपाचे दोन वेगवेगळे किल्ले. युद्धकाळात या किल्ल्यांची महती अधिक जाणवते, कारण एका किल्ल्यावरून दुसऱ्यावर लक्ष ठेवता येते आणि दोन्ही किल्ले एकमेकांना रक्षण पुरवू शकतात.
महाराष्ट्रातील अशाच जोड किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा दुर्ग आहे निमगिरी-हनुमंतगड. हे किल्ले पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, बालाघाटच्या डोंगरमालांमध्ये विसावलेले आहेत. यांची निर्मिती मुख्यत्वेकरून जुन्नर ते कल्याण या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली गेली होती. ह्या मार्गावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवणे, तसेच शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे, हे यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते.
निमगिरी व हनुमंतगड या दोन्ही किल्ल्यांमध्ये एक अरुंद घळ आहे. घळ म्हणजे दोन डोंगरांच्या मधोमध असलेली नैसर्गिक दरी. या घळीमधून गडावर चढाई करता येते. डाव्या बाजूला हनुमंतगड, तर उजव्या बाजूस निमगिरी आहे. दोन्ही किल्ल्यांवर दगडी पायर्या, मजबूत तटबंदी, तलाव व पाण्याची टाकी, तसेच प्राचीन मंदिरे हे त्यांच्या स्थापत्यकलेचे बोलके उदाहरण आहेत.
किल्ल्याच्या आसपासच्या भागात सापडणाऱ्या वीरगळ, कोरीव मूर्ती, गुहा, आणि शिलालेख हे सर्व त्या काळातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचे दर्शन घडवतात. गजलक्ष्मी मंदिर, काळुबाई आणि हनुमान मंदिरे, तसेच महादेवाची पिंड, यामुळे या किल्ल्यांचे धार्मिक महत्त्व देखील अधोरेखित होते.
इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहता, यादव राजवटीपासून या किल्ल्यांचा प्रवास सुरू होतो. यादवांनंतर निजामशाहीची सत्ता येथे स्थिरावली. त्यानंतर हे किल्ले मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेले. अशा प्रकारे निमगिरी-हनुमंतगड हे फक्त दुर्ग नव्हते, तर वेगवेगळ्या राजवटींचे साक्षीदारही राहिले.
या किल्ल्यांमधून फक्त स्थापत्यकलेचा अनुभव येत नाही, तर आपण त्या काळातील राजकारण, लष्करी धोरणं आणि धार्मिक आस्था यांचंही दर्शन घडवतो. स्वराज्य स्थापनेनंतर या दोन्ही किल्ल्यांचा उपयोग लष्करी डावपेचात केला गेला. व्यापारी मार्गांच्या सुरक्षेसोबतच शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणं ही महत्त्वाची जबाबदारी या किल्ल्यांनी पार पाडली.
आजही, या किल्ल्यांवरून पाहताना इतिहासाचं ते जिवंत चित्र आपल्या मनात उमटतं – भक्कम तटबंदी, शांतता लाभलेली मंदिरे, आणि हवेत घोळणारा त्या काळाचा साक्षात्कार. निमगिरी-हनुमंतगड हे जोड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली दुर्गसंस्कृतीचं एक अमूल्य दागिनं होय.