नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने नवी फसवणूक! प्राधिकरणाचे बनावट Instagram अकाउंट, सायबर पोलिसांत गुन्हा
| नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने Instagram वर 'official.kumbhnagari_nashik' हे बनावट खाते तयार करण्यात आले. प्राधिकरणाच्या नावाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी IT Act अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार समोर येत असतानाच आता थेट सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने Instagram वर बनावट खाते तयार करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघड झाला आहे. यापूर्वी कुंभमेळ्याची सरकारी कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश तयार करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते. आता बनावट सोशल मीडिया खात्याच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याने नाशिक शहर सायबर पोलिसांनी संबंधित खात्याच्या धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहर सायबर पोलिसांचे पथक सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असताना Instagram वरील 'official.kumbhnagari_nashik' हे खाते निदर्शनास आले. या खात्यावर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कार्यक्रमांचे रील्स आणि पोस्ट प्रसारित केले जात होते.
खात्याचे नाव आणि त्यावरील मजकूर पाहता हे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक या शासकीय कार्यालयाचे अधिकृत Instagram खाते असल्याचा भास निर्माण होत होता. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी संबंधित खात्याच्या धारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66 (C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे Instagram खाते नेमके कोण चालवत आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी बनावट कार्यारंभ आदेशांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी व्यक्ती आणि या बनावट खात्यामागील व्यक्ती एकच आहे का, याचाही तपास केला जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणुकीचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी कुंभमेळ्याशी संबंधित सरकारी कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट कार्यारंभ आदेश तयार करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांच्या कामांचे बनावट आदेश दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते. आता थेट कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार केल्याचा प्रकार उघड झाल्याने या फसवणुकीचे आणखी एक स्वरूप समोर आले आहे.
दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा, शासकीय योजना आणि सरकारी कार्यक्रमांबाबत माहिती घेताना नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत वेबसाइट आणि व्हेरिफाइड सोशल मीडिया खात्यांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे. बनावट खात्यांद्वारे शासकीय यंत्रणेच्या नावाचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, अधिकृत स्रोतांवरूनच माहितीची खातरजमा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.