पत्रकारितेतील बदल स्वीकारताना मूल्यांची जपणूक काळाची गरज - डॉ. सुकृत खांडेकर
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत पत्रकारिता पुरस्कार सोहळा संपन्न; डॉ. सुकृत खांडेकर यांनी ५४ वर्षांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत आयोजित पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर.
"आजच्या वेगवान डिजिटल युगात पत्रकारिता क्षेत्राचे स्वरूप आमूलाग्र बदलत आहे. या बदलांमुळे रोजगाराच्या आणि प्रगतीच्या नवनवीन संधींची कवाडे खुली झाली असली, तरी या प्रवासात पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक करणे आणि सामाजिक जबाबदारीचे भान राखणे हेच खऱ्या यशाचे गमक आहे," असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. सुकृत खांडेकर यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गरवारे संस्था आणि अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत 'साहित्य भारती' (कोकण प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. वि. गोखले जयंती स्मृती व्याख्यान, ‘गरवारे दर्पण’ वार्षिकांकाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी दि. २४ एप्रिल रोजी संस्थेच्या प्रेक्षागारात दिमाखात संपन्न झाला.
आपल्या ५४ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा पट उलगडताना डॉ. खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा कानमंत्र दिला. युद्ध पत्रकार दि. वि. गोखले, डॉ. अरुण टिकेकर आणि विद्याधर गोखले यांसारख्या दिग्गज संपादकांच्या कार्यशैलीचा आणि त्यांच्या नैतिक अधिष्ठानाचा आढावा घेत त्यांनी जुन्या पिढीतील पत्रकारितेचे संस्कार नव्या पिढीसमोर मांडले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात केवळ माहितीची देवाणघेवाण महत्त्वाची नसून, ती सत्यता आणि संवेदनशीलतेच्या कसोटीवर उतरणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक डॉ. केयूर कुमार नायक यांनी भूषविले. मराठी पत्रकारिता वर्गाच्या समन्वयक आणि कार्यक्रमाच्या आयोजक नम्रता कडू यांनी प्रास्ताविकात वर्गाच्या वर्षभरातील यशस्वी वाटचालीचा व उपक्रमांचा आढावा घेतला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते 'नव माध्यमे- नव्या संधी, नवी आव्हाने' या विषयावर आधारित ‘गरवारे दर्पण’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या सोहळ्यात पत्रकारितेत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला:
- दि. वि. गोखले पुरस्कार (सुवर्णपदक): डॉ. संदीप वरकुटे
- विद्याधर गोखले पुरस्कार: विशाल सवने
- डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार: शर्वरी जोशी-सावंत (महिला पत्रकार)
यासोबतच 'राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे' निकालही जाहीर करण्यात आले. यात अद्वैत अविनाश सोवळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मराठी भाषेचे बदलते स्वरूप’ या विषयावर लिहिलेल्या लेखाला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक शैला गेडाम (विषय: सायबर युगात महिलांची सुरक्षितता) यांना, तर तृतीय क्रमांक ज्योती हलगेकर-जाधव आणि डॉ. योगेंद्र शेळके यांना विभागून देण्यात आला. प्रीती थोरात आणि विजय कामत यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
या प्रसंगी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्रवीण देशमुख, संदीप कुलकर्णी (लोकमंगल प्रकाशन), सिनेट सदस्य धनेश सावंत, नितीन केळकर, मृदुला राजवाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनिशा डुंबरे हिने केले, तर अशिती जोईल हिने उपस्थितांचे आभार मानले. माजी आणि वर्तमान विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एका कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पत्रकारितेच्या पवित्र मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करत या सोहळ्याची सांगता झाली.

Ashiti Joil
यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।
