अपघाताचा बनाव रचून मित्राची हत्या; यावल पोलिसांकडून तिहेरी अटकेसह खुनाचा उलगडा
यावलमध्ये अपघाताचा बनाव रचून मित्राची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह रस्त्यावर टाकून गुन्हेगारांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. खुनाचा उलगडा कसा झाला आणि आरोपींना अटक कशी झाली? जाणून घ्या सविस्तर बातमी.

यावल पोलीस ठाण्याबाहेर संशयित आरोपींसह पोलीस अधिकारी. दारूच्या वादातून मित्रानेच पवन सोळंकेचा खून करून मृतदेह रस्त्यावर फेकला होता.
यावल तालुक्यातील कोळन्हावी परिसरात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका नियोजित खुनाचा पर्दाफाश झाला आहे. सुरुवातीला रस्ते अपघाताचा बनाव करून मृत्यूला अपघाती स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या सखोल तपासात सत्य समोर आले. १८ जून रोजी पहाटे पवन रवींद्र सोळंके (वय २६, रा. कोळन्हावी) याचा मृतदेह रस्त्यावर आढळला होता. मृताच्या मित्रांनी हा ट्रकच्या धडकेमुळे झालेला अपघात असल्याचे भासविले होते, त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. मात्र, घटनास्थळाची पाहणी करताना रक्ताचे डाग कमी आढळल्याने आणि तपासात काही विसंगती दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.
यावल पोलिसांनी फॉरेन्सिक तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादामुळे पवन सोळंके याच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा कट्टा मारून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह रस्त्यावर नेऊन त्याला अपघाती मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी, चेतन मोतीराम कोळी आणि लोकेश दिवाकर महाजन या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत बजाज व पोलीस निरीक्षक रंजनाथ धारबळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कामगिरीमुळे यावल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Jitendra Kotwal, Jalgaon
जितेंद्र कोतवाल, जलगांव – प्रात:काल न्यूज़ टीम के अनुभवी और समर्पित रिपोर्टर जितेंद्र कोटवाल जलगांव से ताज़ा और सटीक समाचार पहुंचाने में अपनी पहचान बना चुके हैं। स्थानीय मुद्दों, समाजिक घटनाओं और प्रशासनिक खबरों पर उनकी गहरी पकड़ है। जितेंद्र अपने निष्पक्ष दृष्टिकोण और तथ्यात्मक रिपोर्टिंग के लिए जाने जाते हैं, जिससे पाठकों को भरोसेमंद और समय पर जानकारी मिलती है। उनके लेखन में स्पष्टता और गंभीरता का समन्वय उन्हें प्रात:काल न्यूज़ का एक विश्वसनीय स्तंभ बनाता है।
