राज्यभर स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात जनआंदोलन तीव्र होत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील निढोरी येथे ग्रामस्थांनी या योजनेला तीव्र विरोध दर्शविला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत निढोरीच्या ग्रामस्थांनी एकजूट होऊन या योजनेला आपला ठाम विरोध नोंदविला. स्मार्ट मीटरमुळे भविष्यात वीज बिलात होणारी संभाव्य वाढ, तांत्रिक त्रुटी आणि ग्राहकांच्या हिताशी संबंधित अनेक गंभीर प्रश्नांवर यावेळी ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली.

बैठकीच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी संबंधित सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक शंकांचे समाधान करण्यात यावे. जोपर्यंत ग्रामस्थांची पूर्वसंमती घेतली जात नाही, तोपर्यंत निढोरीमध्ये कोणतीही योजना राबवू नये, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

या बैठकीत सरपंच सौ. शुभांगी सुतार, उपसरपंच संपत मगदूम आणि सदस्य सत्यजित मगदूम उपस्थित होते. तसेच वैभव एकनाथ कळमकर, एकनाथ शामराव कळमकर, सत्तापा शामराव कळमकर यांच्यासह सुशांत कळमकर, संतोष कळमकर, प्रथमेश कळमकर, युवराज भोसले, सुभाष कळमकर, सुहास कळमकर, अमर कळमकर, विनायक कळमकर, सुनील मगदूम, नितीन रंडे, सत्तापा कांबळे, संतोष रंडे आणि विक्रम पाटील यांसारख्या अनेक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

स्मार्ट मीटरबाबतची वाढती नाराजी लक्षात घेता शासनाने या योजनेचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ग्रामस्थांच्या हितासाठी ही योजना घातक ठरणार असेल, तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Next Story