शिरपूर मतदार पडताळणी मोहीम: २९ जुलैपूर्वी कागदपत्रे जमा करण्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांचे आवाहन
शिरपूरमध्ये विशेष मतदार पडताळणी मोहीम जोरात सुरू असून ५० टक्के काम अजूनही बाकी आहे. २९ जुलैच्या अंतिम मुदतीनंतर तहसील कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी आपल्या गावातच प्रक्रिया कशी पूर्ण करावी, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि सविस्तर माहिती.

शिरपूर तालुक्यातील तसेच तऱ्हाडी ग्रामीण परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या विशेष मतदार पडताळणी (SIR) मोहिमेअंतर्गत ५० टक्के मतदारांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. मतदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे. या पडताळणी प्रक्रियेची अंतिम मुदत २९ जुलै असून, त्यानंतर नागरिकांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थेट शिरपूर तहसील कार्यालयात जावे लागणार आहे. शेवटच्या दिवसांत तहसील कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी गावातील मराठी शाळांमध्ये सुरू असलेल्या केंद्रांवर जाऊन तातडीने फॉर्म भरून कागदपत्रे जमा करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी स्पष्ट केले की, केवळ कागदपत्रे जमा करून प्रक्रिया पूर्ण होत नाही, तर अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून माहिती देणे बंधनकारक आहे. एका अर्जासाठी साधारण १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत असल्याने शेवटच्या दिवसांत नागरिकांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागू शकते. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी [Aadhaar Redacted] कार्डाची झेरॉक्स, एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा आवश्यक आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), दहावी किंवा बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र अथवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाईल. ज्या मतदारांकडे जन्मतारखेचा कोणताही पुरावा उपलब्ध नसेल, त्यांनी आधार कार्डाची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन केंद्रावर उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मतदार यादी अद्ययावत व अचूक ठेवण्यासाठी ही पडताळणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व पात्र मतदारांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.

Pratahkal Newsroom
प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
