शिरपूर तालुक्यातील नवीन आढे येथे गंभीर अवस्थेत असलेल्या एका म्हशीला महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ‘1962’ टोल-फ्री हेल्पलाइनमुळे वेळेत उपचार मिळाले आणि तिचे प्राण वाचले. ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी सुरू करण्यात आलेली ही मोबाइल पशुवैद्यकीय सेवा आपत्कालीन परिस्थितीत किती महत्त्वाची ठरू शकते, हे या घटनेतून समोर आले आहे.

नवीन आढे येथील पशुपालक रणजितसिंग राजपूत आणि त्यांचे सालदार पावरा हे सकाळी म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना म्हशीचे पोट प्रचंड फुगलेले दिसले. तसेच म्हशीची हालचाल पूर्णपणे थांबली होती. सकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध होणे कठीण असल्याने म्हैस वाचणार की नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

ही परिस्थिती लक्षात घेऊन गावातील पोलीस पाटील राजकिरण राजपूत यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ राज्य शासनाच्या मोबाइल पशुवैद्यकीय पथकाच्या ‘1962’ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. सकाळी 07:45 वाजता केलेल्या कॉलनंतर हेल्पलाइन सेंटरकडून घटनेची सर्व माहिती नोंदवून घेण्यात आली आणि तातडीने वैद्यकीय मदत पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले.

कॉल केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित बाविस्कर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी म्हशीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. उपचारानंतरही म्हशीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत डॉ. अभिजित बाविस्कर यांनी दिवसभरात 3 ते 4 वेळा घटनास्थळी भेट देऊन तिच्या प्रकृतीची पाहणी केली. त्यांच्या तत्पर उपचारांमुळे म्हशीचे प्राण वाचले.

ऐन मोक्याच्या वेळी मिळालेल्या या वैद्यकीय मदतीबद्दल पशुपालक रणजितसिंग राजपूत यांनी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागासह डॉ. अभिजित बाविस्कर यांचे मनापासून आभार मानले. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामीण भागातील पशुपालकांनी ‘1962’ या टोल-फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. नवीन आढे येथील या घटनेमुळे आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवेत तातडीच्या मदतीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story