लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, वाहनधारकांची अडवणूक आणि चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आरटीओ कार्यालयावर अनोख्या पद्धतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी डोक्यावर टोपली घेऊन त्यामध्ये दोन कोंबड्या, दारूच्या बाटल्या आणि चिल्लर पैसे ठेवत आरटीओ प्रशासनाचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी आरोप केला की, आरटीओ कार्यालयाकडून विविध कामांसाठी वाहनधारकांना त्रास दिला जात असून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. या प्रकाराविरोधात वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ हे आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोर्चेकऱ्यांनी तब्बल दोन तास आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, मात्र कोणताही अधिकारी समोर न आल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर पोलिसांनी आरटीओ अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी आणले. या वेळी प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी, आरटीओच्या कामकाजात एका महिन्यात सुधारणा झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. या आंदोलनात राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराजसिंह पाटील खंडापूरकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा विधी विभाग ॲड. राणीताई स्वामी, राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहनचालक व वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story