कोल्हापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. रविवारी रात्री ११ वाजल्यापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी व्यापक 'कोंबिंग ऑपरेशन' आणि नाकाबंदी मोहीम राबवली. या धडक मोहिमेदरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तडीपार गुन्हेगाराला धारदार तलवारीसह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख संग्राम दिपक पवार (वय २४, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका, कोल्हापूर) अशी पटली आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहर विभागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, डी.बी. स्टाफ आणि आर.सी.पी. प्लाटूनने ही संयुक्त कारवाई केली. मोहिमेदरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माकडवाला वसाहत आणि कनाननगर परिसरात पोलिसांचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून तपासणी करत होते. याच शोधमोहिमेवेळी माकडवाला वसाहतीमधील पाण्याच्या टाकीजवळ आरोपी संग्राम पवार संशयास्पद स्थितीत आणि हातात धारदार तलवार घेऊन फिरताना मिळून आला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला रंगेहात ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील तलवार जप्त केली.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपी संग्राम पवार याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ५, २७ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा (गुरनं - ४५०/२०२६) दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव आणि पोलीस उप अधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलीस निरीक्षक संतोष डोके, विकास जाधव, किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून, शहरात सुरक्षिततेचा संदेश दिला गेला आहे.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story