कातलाबोळी ग्रामपंचायतीच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशीची मागणी
कोरपणा तालुक्यातील कातलाबोळी ग्रामपंचायतीवर विकासकामे ठप्प असल्यासह नालीचे काम कागदावर दाखवून निधी उचलल्याचा आरोप आहे. आरओ प्लांट, शौचालय आणि मूलभूत सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून चौकशीची मागणी होत आहे.

तस्वीर में कोरपणा तालुक्यातील कातलाबोळी ग्रामपंचायत कार्यालय भवन नजर आ रहा है।
कोरपणा तालुक्यातील कातलाबोळी ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून गावात भरीव विकासकामे झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, काही कामे कागदोपत्री पूर्ण दाखवून निधी उचलल्याचा गंभीर आरोप युवकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पाचभाई यांच्या घरापासून नाल्याकडे जाणाऱ्या नालीचे बांधकाम प्रत्यक्षात झालेले नाही. मात्र, हे काम कागदोपत्री पूर्ण दाखवून निधी उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी असलेला आरओ प्लांट गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आरओच्या नावावर २५ ते ३० नागरिकांकडून एटीएमच्या माध्यमातून रक्कम घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पैशांचा योग्य हिशोब ग्रामपंचायतीकडे आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरओच्या व्यवहारासाठी स्वतंत्र कॅशबुक ठेवण्यात आले आहे की नाही, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक ऑपरेटर, शिपाई तसेच ग्रामसेवक नियमितपणे उपलब्ध नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याचे सांगण्यात आले.
वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेले शाळेचे शौचालय पडक्या वस्तीत बांधण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी ते उपयोगाचे ठरत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामाच्या दर्जाची तसेच त्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महसूल विभागाच्या जागेवर राहणाऱ्या सुमारे ३० ते ३५ कुटुंबांना अद्याप वीजपुरवठ्यासह आवश्यक मूलभूत सुविधा मिळालेल्या नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कुटुंबांना आजही अंधारात राहण्याची वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंकित जोगी, दीपक माहुरे, चेतन टेकाम, संतोष आत्राम, रमाकांत टेकाम, रवींद्र आत्राम, मंगेश आत्राम, रामदास जुमनाके, मारुती रासेकर, तुषार कुडमेथे, भास्कर पिंपळकर, सुभाष जोगी, संतोष आमने यांच्यासह गावातील युवक व ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे.
गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोरपणा तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कातलाबोळी येथे प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी समिती नेमावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील या आरोपांची प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pratahkal Newsroom
प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
