जालना शहरात विविध भागांत भूमिगत केबल टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एअरटेल कंपनीच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीट आणि पेव्हरब्लॉकचे रस्ते बेधडकपणे खोदण्यात आले आहेत. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी रस्ते मूळ स्थितीत आणण्याऐवजी केवळ माती टाकून खड्डे बुजविले जात आहेत, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत भागांत करण्यात आलेल्या या खोदकामामुळे मोठे खड्डे पडले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसाठी हे रस्ते अपघाताचा सापळा बनले असून, पादचाऱ्यांनाही या खोदकामाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या मते, काम सुरू करण्यापूर्वी रस्ता पूर्ववत करण्याचे आश्वासन देणारी संबंधित कंपनी आणि ठेकेदार काम संपल्यानंतर मात्र दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अनेक दिवस उलटूनही सिमेंट रस्ते किंवा पेव्हरब्लॉकची दुरुस्ती न झाल्यामुळे शहराच्या सौंदर्याचे नुकसान होत असून सार्वजनिक मालमत्तेची हानी होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले दर्जेदार सिमेंट रस्ते कोणतीही प्रभावी देखरेख न ठेवता खोदण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. रस्ता खोदण्यापूर्वी संबंधित विभागाने कोणत्या अटींवर परवानगी दिली आणि काम पूर्ण झाल्यावर रस्ता पुन्हा मूळ स्थितीत आणला जात आहे का, याची तपासणी का केली जात नाही, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. नियमानुसार सार्वजनिक रस्त्यांवर खोदकाम करणाऱ्या संस्थांनी काम पूर्ण होताच रस्ता पूर्ववत करणे बंधनकारक आहे आणि झालेल्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्था व ठेकेदारावर असते. मात्र, जालना शहरात या नियमांची पायमल्ली होत असल्याने प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी शहरातील सर्व खोदकामांची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रस्ते त्वरित पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात यावेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनी आणि संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, रस्ते खोदण्यास परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कामाची गुणवत्ता तपासावी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान भरून काढावे, अशी आग्रही मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story