कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अवसायनात काढलेल्या दूध संस्थांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे अवसायनातील दूध संस्थांचा कच्च्या मतदार यादीत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या संस्थांना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. या निर्णयामुळे अवसायनातील तब्बल ४९२ दूध संस्थांच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १२ ऑगस्ट २०२६ रोजी अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेबाबत निर्णय दिला होता. या निर्णयाला मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील श्री. हनुमान सहकारी दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती पी. नरसिंहा व न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, खंडपीठाने याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

अवसायनातील दूध संस्थांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अभिषेक मनु सिंघवी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पी. एस. पटवालिया, ॲड. आनंद लांडगे व ॲड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी यापूर्वी दिलेला आदेश योग्य व कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.

अवसायनातील संस्थांवरील कारवाई रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत सर्वोच्च न्यायालयाने हनुमान सहकारी दूध संस्थेची याचिका फेटाळली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नवरे यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, करंजफेन (ता. राधानगरी) येथील श्री. विठ्ठलाई महिला सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षा सौ. पल्लवी अनुपम वागरे म्हणाल्या की, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायनातील संस्थांचा कच्च्या मतदार यादीत समावेश करण्याचा निर्णय दिल्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेबाबत स्पष्ट निर्णय दिल्याने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

या निर्णयामुळे अवसायनातील दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला असून, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत या ४९२ संस्थांच्या पात्रतेचा मार्ग स्पष्ट झाला आहे.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story