कोल्हापूर: राधानगरी येथील वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी संचालित जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबई यांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संस्थात्मक अवलोकन प्रक्रियेत महाविद्यालयाला प्रतिष्ठेचे 'व्हेरी गुड' मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाने संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यावर राज्यस्तरीय शिक्कामोर्तब झाले आहे.

एमएसबीटीईच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, अत्याधुनिक प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा, अध्यापन पद्धती, विद्यार्थी विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, पारदर्शक प्रशासन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि एकूण व्यवस्थापन यांचे सखोल मूल्यमापन केले. या सर्व निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेने 'व्हेरी गुड' मानांकन मिळविले आहे.

या यशावर प्रतिक्रिया देताना प्राचार्य डॉ. शोभराज माळवी यांनी सांगितले की, हे मानांकन केवळ संस्थेचा सन्मान नसून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक परिश्रमांची पावती आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्याधारित अध्यापन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था भविष्यातही कटिबद्ध राहील. सक्षम व रोजगारक्षम व्यावसायिक घडविणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेचे अध्यक्ष अभिजीत तायशेटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाविद्यालयाने अल्पावधीतच गुणवत्तेची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि परवडणारे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्राशी शैक्षणिक समन्वय वाढविणे आणि कौशल्यविकासाला प्राधान्य देणे या धोरणामुळे संस्थेने शिक्षण क्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. एमएसबीटीईकडून मिळालेले हे 'व्हेरी गुड' मानांकन संस्थेच्या शिस्त, आधुनिक शिक्षणपद्धती आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाला मिळालेली राज्यस्तरीय मान्यता मानली जात असून, राधानगरीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story