दिवेआगर येथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक असून, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा किंवा जबाबदारीतील त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सहलीपूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, समुद्रकिनारी विद्यार्थ्यांना पाण्यात जाण्याची परवानगी कशी देण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांसोबत उपस्थित असलेल्या शिक्षक आणि संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली का, याची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत देखरेखीसाठी पुरेसे शिक्षक किंवा जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या का आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले आहेत.

शाळा, महाविद्यालये, खासगी अकादमी तसेच अन्य शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना सहली, शैक्षणिक भेटी आणि अभ्यासदौऱ्यांसाठी विविध ठिकाणी नेले जाते. अशा वेळी समुद्र, नदी, धरण, तलाव किंवा अन्य जलस्रोतांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना धोकादायक किंवा खोल पाण्यात जाण्यापासून रोखणे, पुरेशी देखरेख ठेवणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे ही संबंधित शैक्षणिक संस्थेची जबाबदारी असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

“विद्यार्थी कोणत्याही संस्थेचे असोत, त्यांना सहलीसाठी बाहेर नेताना त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थेने स्वीकारली पाहिजे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर स्पष्ट मार्गदर्शक सूचना तयार करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल,” असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती मंत्री महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. प्रशासनाने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच शवविच्छेदन आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया संवेदनशीलतेने आणि तत्परतेने पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

घटनेची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येणार असून, निष्काळजीपणा किंवा जबाबदारीतील त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story