साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर अष्टपैलू अभिनेते दादा कोंडके यांच्या 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘आली अंगावर’ या मराठी चित्रपटातील एका गीताची सध्या पुन्हा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे। गीतातील “सोन्याच्या भावात साखर विकली जाय हो” या ओळी आजच्या महागाईच्या वास्तवाशी जोडल्या जात असून, दादा कोंडकेंनी चार दशकांपूर्वी केलेले भाष्य आज अक्षरशः खरे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत।



‘आली अंगावर’ चित्रपटात दादा कोंडके, अशोक सराफ, उषा चव्हाण, निळू फुले आणि भालचंद्र कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या। गोविंद कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची पार्श्वभूमी होती।

आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधी यांच्या वीस-सूत्री कार्यक्रमाचा संदर्भ तसेच राजकीय-सामाजिक व्यंगामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता। चित्रपटातील “आडला नारायण धरी गाढवाचे पाय हो” हे गीतही त्यातील उपरोधिक भाष्यामुळे लक्षवेधी ठरले होते।

“पोरं आईला-बापाला नेतील कोर्टाच्या दारी, पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो, निवडून आल्या वरती नेता जो तो पैसे खाय हो, दमडीच्या मालाला रुपाया लाग, माणुस लागलय पैशाच्या माग” अशा ओळींसोबतच “सोन्याच्या भावात साखर विकली जाय हो” असा उल्लेख करण्यात आला आहे। महागाई, बदलते सामाजिक वास्तव आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा आर्थिक परिणाम यावर दादा कोंडकेंच्या खास विनोदी-उपरोधिक शैलीत भाष्य करण्यात आले होते।

आज साखरेच्या दरवाढीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असताना या गीताची आठवण होत आहे। त्यामुळे “दादा कोंडकेंचे 1982 चे भाकीत की काळाची अचूक जाण?” असा सवाल सोशल मीडिया आणि रसिकांमध्ये उपस्थित होत आहे।

दादा कोंडे यांच्या विनोदामागे केवळ मनोरंजन नसून तत्कालीन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची धार होती। त्यामुळे चार दशकांपूर्वीच्या या गीतातील ओळी आजच्या महागाईशी जोडल्या जाणे हे त्यांच्या निरीक्षणशक्तीचे आणि व्यंगात्मक लेखनाचे वेगळे उदाहरण मानले जात आहे। “धन्य हो दादा तुम्ही... त्याकाळी टिप्पणी केलेले सर्व वाक्य आज कलियुगात सत्य उतरत आहेत,” अशा प्रतिक्रिया नेटकर्‍यांकडून सोशल मीडियावर व्यक्त होत असून, दादा कोंडके नुसते कलाकारच नव्हते, तर ते चांगले भविष्यकार असल्याचेही म्हटले जात आहे। “दादा तुम्हाला... तुमच्या विचारांना... सलाम!” अशा शब्दांत त्यांच्या विचारांना अभिवादन केले जात आहे।

Updated On
Pratahkal Bureau

Pratahkal Bureau

प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story