कोल्हापूर : विजय मोरबाळे

बिद्री (ता. कागल) येथील भारतमाता हायस्कूलच्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कै. व्ही. टी. पाटील माती परीक्षण प्रयोगशाळेला अभ्यासभेट देत माती परीक्षणाची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली. पाठ्यपुस्तकातील ‘मृदा परीक्षण’ हा घटक अधिक प्रभावीपणे समजावा आणि विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

अभ्यासभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मातीचे नमुने कशा पद्धतीने घेतले जातात, मातीतील विविध पोषक तत्त्वांची तपासणी कशी केली जाते, तसेच मातीच्या गुणवत्तेचा पिकांच्या उत्पादनावर कसा परिणाम होतो, याबाबत प्रयोगशाळेचे लॅब इन्चार्ज प्रवीण पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी केमिस्ट मुरलीधर कुराडे व मारुती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.

या उपक्रमाचे आयोजन विषय शिक्षक एस. एस. माजगावकर यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापक टी. आर. पाटील, वर्गशिक्षक व्ही. आर. कुंभार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

या अभ्यासभेटीमुळे विद्यार्थ्यांना मृदा परीक्षणाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता आली. विज्ञान विषयातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगाशी जोडण्यासही त्यांना मदत झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण झाली असून, या अभिनव उपक्रमाचे पालकांमधूनही कौतुक होत आहे.

बिद्री येथील कै. व्ही. टी. पाटील माती परीक्षण प्रयोगशाळेला दिलेल्या या अभ्यासभेटीतून भारतमाता हायस्कूलच्या सातवीच्या विद्यार्थ्यांना माती परीक्षणाच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story