शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत शिरपूर तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, पहिल्या टप्प्यात ६६३ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँका व ग्रामपंचायत स्तरावर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना ४ कोटी ३४ लाख २७ हजार ८५६ रुपये रक्कमेचा प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारने या योजनेद्वारे थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिरपूर तालुक्यातील धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विकास सोसायटीमार्फत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या 'महाआयटी' पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि संबंधित सहकारी व राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

केवळ यादीत नाव येऊन कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात वर्ग होण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार दोन प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्यासाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. आधार प्रमाणीकरणापूर्वी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपला 'अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी' नोंदवणे किंवा तयार करणे आवश्यक आहे. यानंतर फार्मर आयडी आणि आधार कार्डचा वापर करून जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे बोटांच्या ठशांमार्फत ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.

याबाबत बोलताना सहाय्यक निबंधक शिरपूर राजेंद्र विरकर यांनी सांगितले की, शिरपूर तालुक्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पहिल्या यादीत पात्र शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. या पहिल्या यादीतील सर्व शेतकरी बांधवांनी अजिबात विलंब न करता आपल्या संबंधित ग्रामपंचायत किंवा बँकेत जाऊन नाव तपासावे. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे, त्यांनी तातडीने आपले 'अॅग्रीस्टॅक' प्रमाणीकरण आणि आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिरपूर सेतू केंद्रावर सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना वेळेत ई-केवायसी व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा आवाहन केले असून, यामुळेच कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Pratahkal Bureau

Pratahkal Bureau

प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story