जालना: बेपत्ता तरुणाच्या हत्येचा वर्षभरानंतर उलगडा; मित्रानेच आर्थिक वादातून केला खून
जालना येथील बेपत्ता तरुणाचा शोध वर्षभरानंतर संपला असून, एका मित्रानेच आर्थिक वादातून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डीएनए रिपोर्टमुळे मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

जालना स्थित तालुका पुलिस थाना परिसर और हृषीकेश पवार की तस्वीर।
जालना तालुक्यातील योगेशनगर येथील एका २० वर्षीय तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाचा तब्बल वर्षभरानंतर अत्यंत धक्कादायक उलगडा झाला आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून मित्रानेच गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, डीएनए अहवालातून मृतदेहाची ओळख पटली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
योगेशनगर येथील रहिवासी हृषीकेश प्रकाश पवार हा २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी बाजारात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. तो पुन्हा परत न आल्याने त्याची आई ज्योती प्रकाश पवार यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी मिसिंगची नोंद करत शोधमोहीम सुरू केली होती, मात्र मोबाईल कॉल डिटेल्स आणि मित्रांच्या चौकशीनंतरही कोणताही धागादोरा मिळत नव्हता. दरम्यान, कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयीत आरोपी अविनाश अंकुश वाघमारे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने हृषीकेश पवार याची हत्या केल्याची कबुली दिली. पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून बठाण शिवारातील स्वतःच्या शेतात हृषीकेशचा गळा आवळून खून केल्याचे त्याने सांगितले. यावेळी यशराज खांडेभराड हा देखील त्याच्यासोबत उपस्थित होता.
खुनानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका स्कॉर्पिओ वाहनातून नेऊन गोलापांगरी येथील पुलावरून दुधना नदीच्या प्रवाहात फेकून दिला होता. पोलिसांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ ऑक्टोबर २०२५ रोजी सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाच्या नोंदींची पडताळणी केली. संशयास्पद वाटणाऱ्या या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात तो मृतदेह हृषीकेश पवार याचाच असल्याचे आणि ज्योती पवार या त्याच्या जैविक माता असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अविनाश अंकुश वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) (खून) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Achut D. More(Jalna)
Achut D. More (Jalna) प्रातःकाल न्यूज़ के अनुभवी रिपोर्टर हैं, जो जलना क्षेत्र से ताज़ा और भरोसेमंद समाचार लाने में माहिर हैं। उन्होंने सामाजिक, राजनीतिक और स्थानीय घटनाओं पर अपनी गहरी समझ और निष्पक्ष दृष्टिकोण के साथ कई महत्वपूर्ण रिपोर्टिंग की हैं। उनकी रिपोर्टिंग का उद्देश्य पाठकों तक सत्य और तथ्यपूर्ण जानकारी पहुँचाना है, जिससे लोग हर खबर को समझदारी और विश्वास के साथ ग्रहण कर सकें।
