✕
'राजगड' इतिहासाचा साक्षीदार
By EditorialPublished on
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार राजगड किल्ला आता जागतिक नकाशावर तेजाने झळकणार आहे. युनेस्कोने २०२५ मध्ये राजगडाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला असून, मराठी अभिमानाची शिखरे अधिकच उंचावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि स्वराज्याच्या अस्मितेचा जिवंत पुरावा ठरलेला हा गड, आज पुन्हा एकदा जागतिक स्तरावर इतिहासाची सुवर्णपाने उजळवतो आहे.

- साक्षी कुलकर्णी
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि मराठी माणसांच्या मनात उच्च स्थान मिळवलेला राजगड किल्ला हा आपल्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात, भोर गावापासून अंदाजे ४१ कि.मी. अंतरावर हा किल्ला स्थित आहे. राजगडाची मांडणी, त्यावरील माच्या, बुरुज, दरवाजे आणि तलाव यांमुळे हा किल्ला केवळ एक दुर्ग नसून मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचा थाट मांडणारा एक जिवंत पुरावा आहे.
राजगडावरील प्रमुख आकर्षणे म्हणजे सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती तलाव, गुंजवणे दरवाजा, पद्मावती देवी मंदिर, तसेच राजवाड्याचे अवशेष. याशिवाय अष्टप्रधान मंडळींची काही घरे, पाण्याच्या टाक्या, रत्नशाळा, सदरेचे अवशेष, तसेच गुप्त दरवाजे आजही पर्यटकांना त्या वैभवशाली काळात घेऊन जातात. या सर्व गोष्टींच्या संगतीने राजगड हा अभ्यासक, गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे.

इतिहासाच्या पानांत डोकावले तर दिसते की राजगडाचा प्रारंभिक उगम शालिवाहन वंशातील गौतमपुत्र सातकर्णी यांच्याशी जोडला जातो. पुढे इ.स.१४९० मध्ये हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला. इ.स.१६२५ मध्ये तो आदिलशाहीकडे आला. परंतु खऱ्या अर्थाने राजगडाचा सुवर्णकाळ सुरू झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली. महाराजांनी या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम करून त्याला मजबूत आणि सुबक बनवले. शिवाजी महाराजांचे सुरुवातीचे कामकाज याच किल्ल्यावरून चालत असे. स्वराज्याचा विस्तार वाढताच प्रशासन रायगडावर हलवण्यात आले, तरीही राजगडाचे महत्त्व कमी झाले नाही.
राजगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. महाराणी सईबाईंचा अंत याच किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून आल्यावर सर्वप्रथम याच गडावर दाखल झाले. तानाजी मालुसरेला सिंहगडाच्या मोहिमेसाठी आशीर्वाद देण्याची घटना देखील इथेच घडली. इतकेच नव्हे तर राजाराम महाराजांचा जन्म हाही राजगडावरच झाला. यावरून राजगडाची ऐतिहासिक व भावनिक किंमत लक्षात येते.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि स्वराज्यावर आलेल्या संकटाच्या काळात हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला, परंतु थोड्याच अवधीनंतर मराठ्यांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे राजगड हा फक्त एक किल्ला नसून मराठ्यांच्या संघर्ष, त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक ठरला.
आजही राजगडावर चढताना इतिहास जिवंत होतो. माच्यांवरील वाऱ्याचा स्पर्श, अवशेषांमधून उमटणारे प्रतिध्वनी आणि पद्मावती तलावाचे पाणी हे सर्व एखाद्या काळयंत्रातून आपण थेट शिवशाहीच्या सुवर्णकाळात पोहोचलो आहोत असे भासवतात.
याच ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वारसामूल्यामुळे युनेस्कोने २०२५ मध्ये राजगडाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान केला आहे. हा सन्मान केवळ राजगडापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण मराठी इतिहासाला आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला दिलेला आहे.
राजगड हा केवळ एक गड नाही, तर तो स्वराज्याचा अभिमान, शौर्याचा पुरावा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही राजगडाचे स्थान सर्वोच्च आहे.

Editorial
Next Story
Related News
X
