गणेशोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेची मोठी घोषणा : आतापर्यंत ३८० विशेष गाड्या, पनवेल-चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित सेवा
गणेशोत्सव जवळ आला की कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढते. प्रवाशांना सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देता यावा यासाठी भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त २०२५ मध्ये तब्बल ३८० विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांमध्ये पनवेल – चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित गाड्यांचाही समावेश आहे.


मुंबई | २२ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव जवळ आला की कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढते. प्रवाशांना सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देता यावा यासाठी भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त २०२५ मध्ये तब्बल ३८० विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांमध्ये पनवेल – चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित गाड्यांचाही समावेश आहे.
गेल्या वर्षांपेक्षा विक्रमी संख्या
भारतीय रेल्वेने २०२३ मध्ये ३०५ आणि २०२४ मध्ये ३५८ विशेष गाड्या चालवल्या होत्या. मात्र यंदा ही संख्या वाढवून ३८० वर नेण्यात आली आहे. मध्य रेल्वेने एकट्याने ३०२ विशेष सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे महाराष्ट्र आणि कोकण विभागातील वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता होणार आहे.
कोकण रेल्वेवरील थांबे
गणेशोत्सव विशेष गाड्या पारंपरिक थांबे घेत कोकण रेल्वे मार्गावर धावतील. त्यामध्ये कोलाड, इंदापूर, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडुपी, सुरतकल यांसारख्या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
उत्सव काळात विशेष व्यवस्था
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान साजरा होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने २२ ऑगस्टपासूनच गणेशोत्सव विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. आगामी दिवसांत टप्प्याटप्प्याने आणखी गाड्या वाढवल्या जातील.
पनवेल – चिपळूण अनारक्षित विशेष गाड्या
पनवेल आणि चिपळूण दरम्यान एकूण ६ अनारक्षित विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.
-
01159 पनवेल – चिपळूण विशेष (३ फेऱ्या)
-
सुटणार : ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी पनवेलहून दुपारी ४:४० वाजता
-
पोहोचणार : त्याच दिवशी रात्री ९:५५ वाजता चिपळूण
-
-
01160 चिपळूण – पनवेल विशेष (३ फेऱ्या)
-
सुटणार : ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी चिपळूणहून सकाळी ११:०५ वाजता
-
पोहोचणार : त्याच दिवशी दुपारी ४:१० वाजता पनवेल
-
या गाड्या सोमटने, आपटा, पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, खेड, अंजनी आदी स्थानकांवर थांबतील.
कोच संरचना आणि बुकिंग
या विशेष गाड्यांमध्ये ८ मेमू कोच असतील. प्रवाशांना अनारक्षित कोचसाठी UTS प्रणालीद्वारे तिकीट बुकिंग करता येईल. यामध्ये केवळ सामान्य शुल्क आकारले जाणार आहे.
प्रवाशांसाठी रेल्वेची सुविधा
या विशेष गाड्यांचे वेळापत्रक व थांब्यांची माहिती IRCTC वेबसाइट, RailOne अॅप, संगणकीकृत PRS तसेच NTES अॅपवर उपलब्ध आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, “भारतीय रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, खात्रीशीर आणि सोयीस्कर प्रवास देण्यास कटिबद्ध आहे. सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या मागणीची विशेष काळजी घेतली जात आहे.”

