स्वराज्य तोरण 'तोरणा'; स्वराज्याचा पहिला दीपस्तंभ
सह्याद्रीच्या उंच शिखरांवर, ढगांच्या कुशीत आणि वाऱ्याच्या गजरात उभा असलेला तोरणा किल्ला हा फक्त दगड-मातीचा गड नाही, तर स्वराज्याच्या जन्माची घोषणा करणारा पहिला नाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वप्नांची ही पहिली साक्ष आहे. इथेच उलगडली ती कहाणी, जिथून मराठी साम्राज्याच्या गौरवाचा प्रवास सुरू झाला.
_202508111555446381.jpg)
साक्षी कुलकर्णी
महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा वारसा हा फक्त दगडांच्या भिंतींचा नव्हे, तर शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचा जिवंत पुरावा आहे. याच गडांपैकी एक विशेष आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. तोरणा किल्ला म्हंटल तर आपल्या कानांभोवती एक गाणं हे नक्कीच रुंजी घालतं ते म्हणजे -
स्वराज्य तोरण...
स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे!
या गाण्याच्या माध्यमातून स्वराज्याचे तोरण बनणारा 'तोरणा किल्ला' आपल्या सर्वांना नक्कीच आठवतो. आज आपण याच तोरणा गडाविषयी जाणून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर वसलेला हा किल्ला उंचसखल डोंगररांगांवर दिमाखात उभा आहे. आपल्या विशाल आकारामुळे आणि अभेद्य रचनेमुळे याला प्रचंडगड असेही संबोधले जाते.
तोरणा किल्ल्याच्या वास्तूंमध्ये पाण्याची टाकी, मजबूत बुरुज, मेंगाईदेवी मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर, झुंजार माची, हनुमान बुरुज, बिनी दरवाजा, कोठी दरवाजा, कोकण दरवाजा आणि लकडखाना यांचा समावेश होतो. या प्रत्येक वास्तू आजही त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्य आणि युद्धतंत्र सांगतात. किल्ल्याच्या प्रत्येक दरवाज्यातून आणि माचीतून इतिहासाच्या रक्त-घामाने लिहिलेल्या पानांचे दर्शन घडते.
इतिहास पाहिला तर, इ.स. १४७७ मध्ये तोरणा किल्ला बहमनी साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. पुढे अनेक हातांमध्ये बदलत राहिलेल्या या किल्ल्याचा नवा अध्याय सुरू झाला इ.स. १६४६ मध्ये, जेव्हा फक्त सोळा वर्षांचा तरुण छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ला जिंकला. हा विजय म्हणजे फक्त एक किल्ला हस्तगत करणे नव्हते, तर स्वराज्याच्या स्थापनेचा पहिला पायाभरणी दगड होता. यानंतर महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी इथूनच स्वराज्य निर्मितीचा संकल्प साकार करण्यास सुरुवात केली.
तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाही सत्तेला मोठे आव्हान दिले. मुघलांनी हा किल्ला परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना फारसे यश लाभले नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर काही काळ हा किल्ला मुघलांच्या हाती गेला, पण स्वराज्यातील शूर मावळ्यांनी अल्पावधीतच पुन्हा तोरणा किल्ला मराठी मुलूखात सामील केला.
तोरणा किल्ल्याचा भौगोलिक आणि सामरिक दृष्ट्या मोठा फायदा होता. त्याची उंची, आजूबाजूचा कठीण भूभाग, तसेच बुरुज आणि माच्यांची रचना यामुळे तो आक्रमकांसाठी कठीण आव्हान ठरत असे. किल्ल्यावरील झुंजार माची आणि बुरुज हे युद्धकाळातील मावळ्यांच्या रणनीतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
आज तोरणा किल्ला हा फक्त एक ऐतिहासिक स्मारक नाही, तर स्वराज्याच्या स्वप्नांचा आणि संघर्षांचा जिवंत साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह सर्व मराठी जनतेच्या हृदयात या किल्ल्याबद्दल अतूट प्रेम, अभिमान आणि आदर आहे. स्वराज्याच्या पहिल्या किल्ल्यामुळे तोरणा किल्ला म्हणजे प्रेरणेचा स्त्रोत ठरतो.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, ढगांच्या सान्निध्यात आणि वाऱ्याच्या गजरात न्हालेला हा गड आजही पर्यटक आणि गिर्यारोहकांना आमंत्रण देतो. इतिहासप्रेमींसाठी तोरणा म्हणजे वेळ मागे फिरवणारे एक दार, जिथून आपण थेट स्वराज्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पोहोचतो. तोरणा किल्ला फक्त दगडांचा गड नाही, तो म्हणजे पराक्रमाची गाथा, स्वप्नांचा पाया आणि मराठी अस्मितेचा पहिला दीपस्तंभ.
'वज्रगड' आदिलशाहीपासून स्वराज्यापर्यंतचा प्रवास...

