✕
आर्टिफिशियल इंटेलिजन्स; बदलत्या जगाचे धडधडते हृदय
By EditorialPublished on
- अशिती जोईल. आजचं जग तंत्रज्ञानाच्या महासागरात पोहत आहे आणि या महासागराचं धडधडतं हृदय आहे – आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता). मानवनिर्मित यंत्रांनी विचार करणं सुरू केलं आणि आपण नव्या युगात प्रवेश केला. स्मार्टफोनपासून सुपरकंप्युटरपर्यंत, शि

x

- अशिती जोईल.
"ज्ञानाची गती ज्याची ओळख,
भविष्य जिंकण्याची त्याची ताकद."
आज आपण तंत्रज्ञानाच्या महासागरात जगत आहोत. या सागरातील सर्वात प्रभावशाली आणि चर्चेत असलेली संकल्पना म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) – कृत्रिम बुद्धिमत्ता. हा केवळ एक शब्द नाही, तर आपल्या जीवनाचा चेहरामोहरा बदलणारा एक क्रांतिकारी प्रवाह आहे. ज्या क्षणी मानवनिर्मित मशीनने विचार करायला सुरुवात केली, त्या क्षणी आपण नव्या युगात प्रवेश केला, असे म्हणण्यास हरकत नाही. याच नव्या युगाशी जोडण्याचा प्रयत्न ‘टेक्नोलॉजिया’ या सदरच्या माध्यमातून आपण करत आहोत. मागच्या काही लेखांमध्ये आपण AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणजे काय ? ती कार्य कशी करते ? त्याचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग आणि आव्हाने .. या मुद्यांच्या बाबतीत विचार केला आहे. आज आपण AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा करिअरच्या दृष्टीने कसा वापर करता येऊ शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

मनुष्य बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. पण विज्ञानाने अशी साधने निर्माण केली आहेत जी स्वतः शिकतात, विचार करतात आणि निर्णय घेतात. आज आपल्या हातातील स्मार्टफोनपासून ते जगभरातील सुपरकम्प्युटर्सपर्यंत सर्वत्र AI आहे. आपण आदेश देतो आणि यंत्र काम करते. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या युगात मशीन स्वतःच स्वतःचे पुढील पाऊल ठरवते. म्हणूनच आजचे युग 'कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग' म्हणून ओळखले जाते. २०२५ हे वर्ष AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आपण AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयी जाणून घेऊ.

१९५६ साली जॉन मॅककार्थी यांनी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ची संकल्पना मांडली आणि काही दशकांतच त्याने प्रचंड झेप घेतली. आज टेस्ला ही कंपनी ड्रायव्हरलेस कार तयार करत आहे, जी प्रत्येक मिलीसेकंदाला हजारो डेटा पॉइंट्स तपासून प्रवास अधिक सुरक्षित करते. गूगल मॅप्स हे सॉफ्टवेअर प्रवास अधिक सोपा करत आहे, तर क्रूझ सारख्या कंपन्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) वर चालणाऱ्या रोबोटॅक्सी सेवा पुरवत आहेत. रिटेल, सुरक्षा, फॅशन, उत्पादन, क्रीडा, शिक्षण इत्यादींसारख्या क्षेत्रातही AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर आढळून येतो.
AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ने वेळेचे गणित अगदीच बदलून टाकले आहे. ज्या कामांसाठी पूर्वी तास लागायचे ती कामे आता काही सेकंदांतच पूर्ण होतात. उद्योगांची उत्पादनक्षमता झपाट्याने वाढलेली आढळून येत आहे. मशीन लर्निंग, डीप लर्निंगसारख्या शाखांमध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. जगभरातील कंपन्या या कुशल AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) व्यावसायिकांना आकर्षित करत आहेत.
शिक्षणक्षेत्रही AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. अनेक शाळांनी हा विषय अभ्यासक्रमाचा भाग बनवला आहे. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) मुलांची कल्पनाशक्ती, तार्किक विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवतो. मुलांना लहानपणापासूनच AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) शी परिचित करून देणे म्हणजे भविष्यासाठी सज्ज करणे असे म्हणायला काही हरकत नाही.
डिजिटल सुरक्षेच्या बाबतीतही AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्रांती घडवत आहे. ऑनलाइन बँकिंग, डेटा संरक्षण आणि फसवणूक नियंत्रणात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) महत्त्वाची भूमिका निभावत आहे. संरक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेतसुद्धा AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे योगदान अमूल्य ठरताना दिसत आहे.
'नवे तंत्रज्ञान नवा विश्वास, भविष्यात टिकण्याचा हाच खरा ध्यास' असे म्हणत भविष्यात अब्जावधी तरुण रोजगाराच्या शोधात असताना AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) त्यांच्यासाठी नवनव्या संधींची दालने उघडू शकेल. ज्यामुळे AI मध्ये करिअर करणे हा केवळ ट्रेंड नाही, तर भविष्यात काळाची गरजसुद्धा बनू शकेल असे म्हणता येईल.

बदलत्या जगाचा नवा चेहरा बनू शकणारे हे तंत्रज्ञान मानवी जीवन अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि सर्जनशील बनवत आहे. त्यामुळेच लहानपणापासूनच मुलांना AI शी जोडले गेले पाहिजे. पण, त्याची सकारात्मक बाजू आणि मर्यादा लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने करण्याचे हे काम आहे. या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नव्या संधींविषयी अधिक जाणून घेऊयात, पण लेखाच्या पुढील भागात.. तूर्तास धन्यवाद!

Editorial
Next Story
Related News
X
