खडकांच्या देशा… रॉक क्लाइंबिंग
- विनश्री राणे
जीवनात काही क्षण असे येतात जे आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. अरुणिमा सिन्हाची गोष्ट त्याचं उत्तम उदाहरण आहे. २३ वर्षीय अरुणिमा ट्रेनने प्रवास करत असताना काही चोरांनी तिचं सामान हिसकावलं आणि तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं. त्या अपघातात तिने एक पाय कायमचा गमावला. त्याचसोबत हरवला आत्मविश्वास, जगण्याची उमेद आणि आधीची स्वतःची ओळख. समाजाने तिच्याकडे "अपंग" या लेबलने पाहायला सुरुवात केली. कुणी सहानुभूती दाखवू लागलं तर कुणी चिडवू लागलं.
परंतु त्या अपघातानंतर केवळ दोन वर्षांनी हिच अरुणिमा, जिला अपंगत्वामुळे चिडवलं गेलं होतं, तिने अशक्यप्राय गोष्ट साध्य केली – पाय गमावल्यानंतरही तिने एव्हरेस्ट सर केलं आणि हे करणारी पहिली महिला ठरली. अपार धैर्य, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर तिने स्वतःसाठी एक नवी ओळख आणि इतिहास घडवला. त्या दिवशी "साहस" शब्दालाच जणू नवी व्याख्या मिळाली.

खडकांच्या देशा… रॉक क्लाइंबिंग
रॉक क्लाइंबिंग हा फक्त खेळ नाही, तर स्वतःशी आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. उंचच उंच खडकांवर दोरीच्या साहाय्याने किंवा कधी दोरीशिवाय चढताना अंगावर रोमांचक थरार पसरतो. जमिनीपासून काही फूट वर आणि आकाशापासून काही फूट खाली लटकताना आजूबाजूला सणसण करणारी हवा, हिरवीगार झाडांची स्पर्धा आणि वरून पडणारे दगड व माती यांचा सामना करत वर चढणं – ही खरी कसोटी असते. मात्र, एकदा शिखरावर पोहोचल्यानंतर दिसणारा नजारा हे सगळे कष्ट सार्थकी लावतो. जरी घरी परतल्यावर अंगदुखीने जखडून गेलं असलं, तरी त्या चढाईचा अनुभव "रिअल डोपामिन" ठरतो.
खडकांच्या देशा… रॉक क्लाइंबिंग
पूर्वी आपल्या पूर्वजांसाठी खडकांवर चढणं ही जीवनावश्यक गरज होती – गुहेत राहणं, झाडांवर सरकणं, डोंगर-कड्यांवर चढणं हे त्यांचं दैनंदिन होतं. आज मात्र माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. रॉक क्लाइंबिंग हे हरवलेलं निसर्गाशी नातं पुन्हा जुळवून देते. साहस, रोमांच आणि निखळ आनंद देणारा हा खेळ आज अनेक साहसप्रेमींचा आवडता ठरत आहे.
महाराष्ट्रातील रॉक क्लाइंबिंग ठिकाणे :
  • सह्याद्री पर्वतरांग: सिंहगड, प्लस व्हॅली, पावनगड, नागफणी (ड्यूकची नाक), हरीहर, अलंग, राजमाची, राजगड, टिकोना, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट
  • मुंबई व परिसर: कण्हेरी गुहा, मंब्रा बोल्डर्स, सीबीडी बेलापूर, मानोरे खडक, येऊर हिल्स, ठाणे (रॉक्सपोर्ट कॅम्प), अरुण सामंत क्लाइंबिंग वॉल (गोरेगाव), पोद्दार क्लाइंबिंग वॉल (माटुंगा), हाय रॉक (पवई)
  • पुणे व परिसर: गिरीनगर, रॉक एलियन्स क्लाइंबिंग जिम
  • इतर प्रांत: हम्पी, मधुगिरी (कर्नाटक), पार्वती व मियार व्हॅली (हिमाचल), शी रॉक (जम्मू-काश्मीर), भीमबेटका (मध्य प्रदेश), माउंट अबू (राजस्थान), पावागड व इदार (गुजरात).
खडकांच्या देशा… रॉक क्लाइंबिंग
रॉक क्लाइंबिंग करताना घ्यावयाची काळजी :
  • प्रमाणित प्रशिक्षकाकडून योग्य प्रशिक्षण घ्या.
  • हेल्मेट, हार्नेस, क्लाइंबिंग शूज यासारखं सुरक्षा साहित्य वापरा.
  • आपल्या कौशल्य आणि फिटनेसच्या मर्यादा ओळखूनच मार्ग निवडा.
  • हवामान अनुकूल नसेल तर चढाई टाळा.
  • चढाईपूर्वी वॉर्मअप करा, गाठी व बेले प्रणाली तपासा आणि पार्टनरसोबत स्पष्ट संवाद ठेवा.
  • हातांपेक्षा पायांचा जास्त वापर करा आणि शरीर भिंतीजवळ ठेवा.
  • थकवा किंवा चक्कर आल्यास त्वरित चढाई थांबवा.
  • हायड्रेटेड राहा, हलकं भोजन करा आणि पर्यावरणाचा सन्मान राखा.
खडकांच्या देशा… रॉक क्लाइंबिंग
आजच्या धावपळीच्या जगात मुळात निखळ आनंद देणाऱ्या गोष्टी हरवतच चालल्या आहेत…त्यातही ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये… अश्या वेळेस rock climbing हा खेळ निसर्गाच्या सानिध्यात राहून अक्षरशः गड सर केल्याचा निखळ आनंद देऊन जातो. म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा ही adventure प्रेमी पाठीवर बॅग मारून rock climbing करायला बाहेर पडतात.
चला तर मग तयार आहात का काहीतरी तुफानी करायला ?
Editorial

Editorial

Next Story