- साक्षी कुलकर्णी
शिवजन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा जुन्नर प्रांत इतिहासात आपली वेगळी ओळख निर्माण करून गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आणि बालपण याच पवित्र भूमीत घडलं. जुन्नर तालुका हा इतिहासाचा खजिना असून, या परिसरातील किल्ले म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वैभवशाली वारसा आहेत. अशाच किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे हडसर किल्ला, ज्याला 'पर्वतगड' म्हणूनही ओळखले जाते.
हडसर किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, नाणेघाटाच्या डोंगररांगेत वसलेला आहे. जुन्नरपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी गिर्यारोहणाची मजा अनुभवता येते. किल्ल्यावरती एक भव्य प्रवेशद्वार, पाण्याची टाकी, कोरीव कोठारे, गुहा, तलाव, महादेवाचे मंदिर व मजबूत बुरुज अशा अनेक ऐतिहासिक आणि कलात्मक रचना आजही पाहायला मिळतात. या किल्ल्यावरची कोरीव कामे आणि स्थापत्यशास्त्र ही त्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
ऐतिहासिक वारशाची शान
सातवाहन काळात उभारण्यात आलेल्या या किल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नाणेघाटावर नियंत्रण ठेवणे. नाणेघाट हा प्राचीन काळात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग होता. पश्चिम किनाऱ्यावरून येणारे व जाणारे दळणवळण या घाटातूनच होत असे. त्यामुळेच या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी हडसर, जीवधन व चावंड या किल्ल्यांची उभारणी करण्यात आली होती.
ऐतिहासिक वारशाची शान
सातवाहनांनंतर यादव, बहमनी, मोगल, शिवशाही आणि शेवटी पेशवे अशा विविध राजवटींनी हडसर किल्ल्यावर सत्ता गाजवली. १६३७ मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला आणि शिवशाहीत या किल्ल्याला 'पर्वतगड' असे नाव मिळाले. १६६५ च्या पुरंदर तहामध्ये शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये हडसरचाही समावेश होता. काही वर्षांनी मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला, मात्र १७०२ मध्ये औरंगजेबाने त्यावर ताबा मिळवला. अखेरीस १७४८ मध्ये पेशव्यांनी तो पुन्हा मराठा साम्राज्यात समाविष्ट केला.
हडसर किल्ल्याचा इतिहास म्हणजे सत्ता, व्यापार, आणि भू-राजकारण यांचा एक सुरेख संगम आहे. प्रत्येक राजवटीचा उद्देश हा नाणेघाटावर लक्ष ठेवण्याचा होता, जेणेकरून व्यापारावर नियंत्रण ठेवता येईल. म्हणूनच हडसर किल्ल्याला 'नाणेघाटाचा संरक्षक' असे गौरवाने संबोधले जाते.
ऐतिहासिक वारशाची शान
आजही हडसर किल्ला इतिहासप्रेमींना आणि गिर्यारोहकांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्याच्या भव्यतेत, ऐतिहासिक घटनांमध्ये आणि भौगोलिक स्थानामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा ठसा स्पष्टपणे दिसतो. हडसर हा केवळ एक किल्ला नसून, तो एक साक्षीदार आहे आपल्या गौरवशाली परंपरेचा आणि शौर्यगाथांचा.
हे ही वाचा :
Editorial

Editorial

Next Story