कोंढाण्याचा सिंहगड होण्याचा एक चित्त थरारक इतिहास..
साक्षी कुलकर्णी
“गड आला पण सिंह गेला!” हे ब्रीदवाक्य ऐकताच आपल्या मनात जो गड डोळ्यांपुढे उभा राहतो, तो म्हणजे सिंहगड. इतिहासात 'कोंढाणा' या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला महाराष्ट्राच्या गडकोट परंपरेतील एक तेजस्वी ठिपका आहे. सिंहगडाच्या भूमीवर घडलेला शौर्य, बलिदान आणि स्वराज्यनिष्ठेचा इतिहास आजही प्रत्येक मराठी मनात अभिमानाची ज्वाला पेटवतो. महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास म्हणजे आपल्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या पराक्रमी वीरांचा इतिहास. या वीरांच्या शौर्यगाथा आणि बलिदानांनी आजही आपण गर्वाने मस्तक उंचावतो. या शौर्यगाथेतील एक अजरामर पर्व म्हणजे सिंहगड किल्ला, ज्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते.
सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस स्थानकापासून अंदाजे ३०-४० किलोमीटर अंतरावर असून भुलेश्वर डोंगररांगांमध्ये वसलेला आहे. निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या या किल्ल्याचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. काही ऐतिहासिक पुराव्यानुसार कोंढाणा किल्ला यादव काळात बांधण्यात आला. नंतर शिवशाहीत त्याचे सामरिक महत्त्व अधिकच वाढले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४७ मध्ये हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. पण पुढे काही काळासाठी आदिलशहाने कोंढाणा पुन्हा आपल्या ताब्यात घेतला, कारण त्याने शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांना बंदी बनवले होते. शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी तडजोड म्हणून कोंढाणा परत दिला. पण नंतर काही वर्षांनी बापूजी मु. देशपांडे यांच्या मदतीने हा किल्ला पुन्हा स्वराज्यात परत आणला.

कोंढाण्याचा सिंहगड होण्याचा एक चित्त थरारक इतिहास..
१६६५ मध्ये मुघल सेनापती मिर्झाराज जयसिंग याने पुरंदर किल्ला वेढून घेतला आणि शिवाजी महाराजांशी तह करण्यात आला. हा तह म्हणजे पुरंदरचा तह होय. या तहानुसार शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले, त्यात कोंढाण्याचाही समावेश होता.
पुढे १६६९-७० दरम्यान शिवाजी महाराजांचे बालमित्र आणि स्वराज्याचे निष्ठावंत सरदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकण्यासाठी मोहिम हाती घेतली. किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी प्राणपणाने लढा दिला. उदयभान राठोड या मुघल सेनापतीशी झालेल्या युद्धात तानाजींनी शत्रूला नामोहरम केले, पण स्वतः मात्र वीरमरण पावले. ही घटना ऐकून शिवाजी महाराज म्हणाले – “गड आला, पण सिंह गेला.” त्या वीराच्या स्मृतीला आदरांजली म्हणून कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड’ ठेवण्यात आले.
कोंढाण्याचा सिंहगड होण्याचा एक चित्त थरारक इतिहास..
सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा, तानाजी मालुसरे यांचे स्मारक, राजाराम महाराजांचे समाधीस्थळ, झुंजार बुरूज, देवटाके, कोंढाणेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, टिळक बंगला ही ठिकाणे आजही त्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात.
संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे बंधू राजाराम महाराज काही काळ सिंहगडावर वास्तव्यास होते. त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार सातारा, कोल्हापूर, जिंजीपर्यंत नेला. पण फुफ्फुसाच्या आजारामुळे अवघ्या ३० व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनाचा अंतही याच सिंहगड भूमीत झाला.
आज सिंहगड किल्ला काहीसा जीर्ण अवस्थेत असला तरीही तो आपल्या पराक्रमाची, बलिदानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची जिवंत आठवण आहे. मावळ्यांचे रक्त, शिवरायांचा ध्यास आणि तानाजींचे बलिदान या गडाच्या मातीला पावन करतात. म्हणूनच, सिंहगड हा केवळ एक किल्ला नसून तो मराठी अस्मितेचा आणि स्वातंत्र्याच्या चिरंतन प्रेरणेचा स्तंभ आहे.
Next Story