✕
'जीवधन किल्ला' : साहस, संस्कृती आणि स्वाभिमानाचा थरारक संगम
By EditorialPublished on
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये दडलेली ही एक अशी गाथा आहे, जिथे निसर्गाची मोहिनी आणि इतिहासाचे तेज एकत्रितपणे नांदते. नाणेघाटाच्या कुशीत विसावलेला जीवधन किल्ला केवळ एक प्राचीन वास्तू नाही, तर तो मराठी स्वाभिमानाचा एक अमिट ठसा आहे. शतकानुशतकं व्यापारी मार्गांवर नजर ठेवणारा, शूर मराठ्यांच्या इतिहासाला साक्ष देणारा, आणि इंग्रजी आक्रमणांच्या झळा सोसलेला हा किल्ला आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. जीवधनचा प्रत्येक दगड, प्रत्येक वाट, आणि प्रत्येक शिल्प आपल्याला इतिहासात फेरफटका मारून आणते. या लेखाच्या माध्यमातून
_202506161524496444.jpg)
x
_202506161524496444.jpg)
साक्षी कुलकर्णी
सह्याद्रीच्या रांगांमध्ये लपलेले अनेक दगड-मातीचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे जिवंत दस्तऐवज. त्या रांगांमध्येच विसावलेला जीवधन किल्ला आणि नाणेघाट यांचा परिसर, फक्त निसर्गाच्या रमणीयतेचा अनुभव नाही, तर इतिहासाच्या पाऊलखुणांचा शोधही आहे.
निसर्गसंपन्न जीवधन :
पुण्यापासून अंदाजे १२० ते १३० किलोमीटर अंतरावर घाटघर गावाजवळ वसलेला जीवधन किल्ला, नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी सातवाहन कालखंडात उभारण्यात आला. नाणेघाट हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक घाटमार्ग असून, त्याच्या सुरक्षिततेसाठी उभारलेला हा किल्ला त्यावेळच्या संरक्षणात्मक दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण ठरतो.

किल्ल्यावर पोहोचल्यावर जीवाई देवीचे मंदिर, गजलक्ष्मीचे कोरीव शिल्प, प्राचीन धान्य कोठार, खोदीव पाणी टाक्या आणि नानाचा अंगठा तसेच वानरलिंगी सुळका या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांचे दर्शन होते. यातील वानरलिंगी सुळका उंच आणि कठीण चढाईसाठी ओळखला जातो, तर नानाचा अंगठा ही एक अद्वितीय कडा असून तिची रचना मानवी अंगठ्यासारखी भासते.
इतिहासाचा साक्षीदार :
जीवधन किल्ल्याचा इतिहास ११७० ते १३०० या काळात यादव घराण्याच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर १४८८ मध्ये किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला. याच काळात शहाजीराजे भोसले आणि मूर्तिजा निजाम यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते. नंतर १६६३ मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७२ च्या सुमारास मोहीम आखून हरिश्चंद्रगडासह जीवधन किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील केला.
१७०२ मध्ये पुन्हा मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. हा किल्ला मराठा-मुघल संघर्षात अनेकदा हस्तगत झाला. पण १८१८ मध्ये इंग्रजांनी तोफांच्या साहाय्याने किल्ला उद्ध्वस्त केला आणि कातळांतून घडवलेल्या वाटा देखील नष्ट केल्या.

आजचा जीवधन :
आजही जीवधन किल्ला आपल्या शौर्यगाथा सांगणाऱ्या भग्नावस्थेतील वास्तू, निसर्गाच्या कुशीत विसावलेले दृश्य आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या कोरीव शिल्पांमुळे पर्यटकांना खुणावत असतो. नाणेघाट आणि जीवधन किल्ला एकत्रितपणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गमय वारशाचे प्रतीक ठरतात.

जीवधन किल्ला हा केवळ एक किल्ला नाही, तर तो महाराष्ट्राच्या इतिहासातील स्वाभिमान, शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. नाणेघाटासह जीवधन किल्ला पाहताना जणू इतिहास प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकतो. मराठी मातीतील ही वैभवशाली ठिकाणं आपल्या गौरवशाली वारशाची आठवण करून देतात आणि आपल्या संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जातात.
जाऊ किल्ल्यांच्या प्रांता – अनुभवूया मराठी वैभवाची गाथा!
हे ही वाचा :

Editorial
Next Story
Related News
X
