Santosh Deshmukh
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला असून, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान, पाच गोपनीय साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांमुळे या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली आहे. तिरंगा हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या कटात वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचा सहभाग असल्याचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत.
६ डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संतोष देशमुख यांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता. गावात मोठी दहशत असलेल्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांचा या गुन्ह्यात सहभाग असून, हे तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी वसुलीचे काम करत असल्याचे एका साक्षीदाराने सांगितले आहे. दुसऱ्या एका साक्षीदाराच्या जबाबानुसार, वाल्मिक कराडने जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्यासाठी अनेक टोळ्या तयार केल्या आहेत. त्याच्या आदेशानुसार, विविध कंपन्यांकडून खंडणी वसूल केली जात होती. खंडणी न दिल्यास संबंधित कंपन्यांवर दबाव टाकला जात असे, तर विरोध करणाऱ्यांना धमकी, मारहाण किंवा अपहरण करून दहशत माजवली जात होती.
वाल्मिक कराडच्या अटकेनंतर त्याच्या समर्थकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. मात्र, तपासातून हे आंदोलक त्याच्याच टोळीतील असल्याचे समोर आले आहे. सीआयडीने संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून १,२०० पानी आरोपपत्र दाखल केले असून, १८० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या हत्याकांडाने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Editorial

Editorial

Next Story