The Bone Collector
या चित्रपटाचं नाव घेतलं की आठवतो डेन्झेल वॉशिंग्टन, मानेपासून पायापर्यंत सारा देह अचेतन. अपवाद एका हाताच्या अंगठ्याचा. चोवीस तास बेडला किंवा चाकांच्या खुर्चीला जखडलेल्या या देहाचा मालक असलेला मेंदू मात्र कमालीचा सजग आणि तीक्ष्ण प्रज्ञेचा. गुन्हयाच्या स्थळी गुन्हेगाराने कळत नकळत मागे सोडलेल्या दुव्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून बसल्या जागेवरून त्याचा माग काढणारा फोरेन्सिक तज्ज्ञ 'लिंकन हाइम' डेन्झेलने या चित्रपटात रंगवला होता. त्याला साथ देणारी अँजेलीना ज्योली या चित्रपटातूनच खऱ्या अर्थाने लक्षवेधक ठरली होती. केवळ डेन्झेलला आवाहन म्हणून, त्याला नामोहरम करण्यासाठी एका पाठोपाठ हत्या करून तिथे पुढच्या हत्येचा दुवा मागे सोडणारा खुनी आणि त्याला अडवण्यासाठी ते पुढचे ठिकाण शोधून काढण्याची पराकाष्ठा करणारे डेन्झेल-ज्योली यांच्यातील हा सामना पाहताना आपण खुर्चीला खिळून बसलेलो असतो…
सांगायचा मुद्दा असा की, हा सगळा थरार सर्वप्रथम रचला गेला तो याच नावाच्या कादंबरीतून लेखक जेफ्री डीव्हर. चित्रपट पाहताना आपण पडद्यावरील बुद्धीबळात इतकं रंगून जातो की या सगळ्यामागे असणारा कुणी लेखक, पटकथाकार आपण जमेत धरत नाही. आणि ते स्वाभाविक आहे. लिखाणाइतकचं ताकदीचं, अभिव्यक्तीला कदाचित अधिक वाव आणि दिशा मिळणारं असं चित्रपट हे माध्यम आहे. पडद्यावर रंगलेला खेळ अनुभवताना आपण इतकं पछाडलो जातो की दोन्ही डोळे कमी आणि साऱ्या संवेदना अपुऱ्या वाटू लागतात. पण पडद्यावरील चित्रपट संपल्यावर मनात रेंगाळायला लागतो, नजरेसमोरून हटता हटत नाही. त्या वेळी मग या पडद्यामागील कलाकारांना जाणून घ्यायची उत्सुकता छळायला लागते. 'बोन कलेक्टर' पाहिल्यावर माझं तसंच झालं. पडद्यावर पाहिलेल्या साऱ्या थरारनाट्याचा पहिला रचनाकार जेफ्री आहे याची माहिती नंतर मिळाली. जेफ्रीची आणि माझी ती पहिली गाठभेट.
मग परवा त्याचा ‘मोअर ट्वीस्टेड' हा कथासंग्रह हाती आला आणि जेफ्रीची पुन्हा भेट झाली. कधी कधी एखादा लेखक अवचित समोर येतो तसं झालं काहीसं. म्हणजे लेखक माहिती असतो, त्याची पुस्तकं माहिती असतात, काही वाचलेली असतात, त्याच्या पुस्तकांवरील सिनेमानं आनंद दिलेला असतो... मग पुन्हा काही कालावधीनंतर त्याचंच आणखी एखादं पुस्तक हातात येतं, नाव वाचल्यावर लक्षात येतं की अरेच्चा हाच की तो. 'दासावा'त अवचितपणे समोर आलेल्या 'मोअर ट्वीस्टेड'नं हाच अनुभव दिला.
कुठलंही लिखाण वाचकाला गुंगवून ठेवणारं हवं हा जेफ्रीचा आवडता मापदंड. लघुकथा तर एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखी सुसाट वेगाने वाचकाला भिडायला हवी, असं तो म्हणतो. त्याचा हा दुसरा कथासंग्रह. अर्थातच गुन्हेगारी कथा. पण प्रत्येक कथा वेगळ्या बाजाची, धाटणीची. शेवट काय याचा अंदाज शेवटच्या परिच्छेदापर्यंत येणार नाही असा त्याचा दावा. काही कथा त्याचा हा दावा खरा ठरवतात. यातही लिंकन हाइमची एक कथा आहे. एकेकाळी जेफ्री पत्रकार होता. आणि त्याआधी लोकगीत गायक. सॅन फ्रान्सिस्को, शिकागो इथल्या क्लबमध्ये मस्त गाणी म्हणायचा, गाणी लिहायचा, संगीताविषयी बोलायचा. काही काळ त्याने कंपनी सल्लागार म्हणूनही वकिली केली आहे. जवळपास २५ पुस्तकं आणि 'ट्वीस्टेड' व 'मोअर ट्वीस्टेड' हे दोन कथासंग्रह असं त्याचं लिखाण आजवर २५ भाषांमध्ये अनुवादित झालंय आणि दीडशे देशांमध्ये त्याची पुस्तकं हातोहात खपतात. सर्वोत्तम रहस्यकथा लेखनाबद्दलचे सारे पुरस्कार त्याच्या खात्यात जमा आहेत. मजा म्हणजे त्याच्या 'द कोल्ड मून' या पुस्तकानं जपानमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. बोन कलेक्टर आपल्याला माहिती आहेच, पण 'द ब्ल्यू नोव्हेअर', 'द डेव्हील्स 'टिअरड्रॉप' या त्याच्या कादंबऱ्यांचे हक्कही त्याने चित्रपटांसाठी विकले आहेत.
आपल्याला चित्रपटातलं, दिग्दर्शनातलं काही कळत नाही, ज्याचं काम त्याला करू द्यावं, अशा मताचा जेफ्री यामुळेच बोन कलेक्टरपासून दूर राहिला होता. त्याची बरीचशी पुस्तकं गुन्हेगाराची मानसिकतेचा धांडोळा घेणारी असतात. 'मला थरारकथा, रहस्यकथा लिहायला आवडतात. पण त्या लिहिण्याआधी माझा बराचसा वेळ कथानक रचण्यात, माहिती घेण्यात जातो. त्यानंतरच मी प्रत्यक्ष लिहायला सुरुवात करतो. अतिशय कमी कालावधीत घडणारे कथानक, आणिबाणीचे प्रसंग, धक्कादायक वळणं आणि संभ्रमावस्था ही माझ्या लेखनाची वैशिष्टये आहेत. माझं प्रत्येक पुस्तक तसं असावं यासाठी माझी धडपड सुरू असते. एका अंधाऱ्या खोलीत विचारमग्न अवस्थेत या साऱ्या प्रक्रियेला प्रारंभ होतो', असं तो सांगतो.
जे काही लिहिलयं त्याचं किमान वीसवेळा पुनर्लेखन करणारा हा लेखक आहे. 'लिखाणासाठी मी कुठेही बैठक मारू शकतो. विमानात, हॉटेलच्या खोल्यांमध्ये, माझ्या घरात कुठेही. ऑफिसमध्ये फारच गर्दी झाली तर किचनमध्ये, तिथेही जागा उरली नाही तर बेडरुममध्ये. बऱ्याचदा तर आधी मनात काय लिहायचंय ते ठरवून मी डोळे मिटून टाइप करायला सुरुवात करतो.
चांगलं लिहिणं ही एक कला आहे. ती शिकण्याचा एक गुरुमंत्र जेफ्रीनं दिलाय. तुम्हाला जे लेखक आवडतात, भावतात त्यांच्या लिखाणाचा, साहित्याचा, शैलीचा अभ्यास करा, हा तो गुरुमंत्र. रहस्यकथा लेखक मिकी स्पीलेननं त्याला एक गुरुमंत्र दिला होता - लोकं पुस्तकं वाचतात ती शेवट जाणून घ्यायला, मध्येच वैतागून फेकून देण्यासाठी नव्हे... जेफ्रीनं तो ध्यानी घेतलायं, तंतोतंत अमलात आणलाय.
मिकीनं सांगितलंय ते अधिक प्रॅक्टीकल आहे. लिहायचं तर वाचणारा शेवटपर्यंत गेला पाहिजे, तरच मेहनतीचं फळ मिळणार (लेखकाला ). नाही का ?
Editorial

Editorial

Next Story