✕
'हा अविश्वास प्रस्ताव केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न'
By EditorialPublished on
'जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे', असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत म्हटले. तसेच जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील चोख उत्तर दिले.

x

नवी दिल्ली : 'जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे', असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत म्हटले. तसेच जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील चोख उत्तर दिले. मणिपूरच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची बाजू लोकसभेत मांडली.
दोन वेळा आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत असे म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं अनेक अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. सरकारने त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हटवली असं अमित शाह म्हणाले.
अविश्वासाचा प्रस्ताव जेव्हा तुम्ही घेऊन येता तेव्हा तुम्ही सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता, त्यामुळे याबाबत सरकारची बाजू मांडणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे उभा आहे. या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, 'जनता सगळ बघत आहे त्यांना सगळं माहित आहे. त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही. '
अमित शाह यांनी म्हटलं की, अविश्वास प्रस्तावाला आमचा कोणताही आक्षेप नाही. पण आपलं स्वत:चं सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचार करणं हे युपीएचं वैशिष्टये आहे. पंतप्रधान मोदींनी 'भ्रष्टाचार छोडो इंडिया, राजवंश छोडो इंडिया आणि तुष्टीकरण छोडो इंडिया'चा नारा दिला आहे. सत्तेचे रक्षण करणे हे युपीएचं काम आहे, असं म्हणत अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधकांवर टीकास्त्र डागले. तर या अविश्वासाच्या प्रस्तावाला काही अर्थ नसल्याचे म्हणत अमित शाह यांनी सरकारच्या कामाचा पाढा वाचला.
मोदी सरकारच्या काळात काश्मिरमधील दहशतवाद संपवण्यांचे काम आम्ही केले आहे. काश्मिरमधील दलित आदिवासींना आम्ही आरक्षण दिलं. तर देशाविरोधात कारवाई करणाऱ्यावर आम्ही कारवाई केली असं अमित शाह यांनी संसदेत सांगितले. मणिपूरमधील घटना ही लज्जास्पद आहेच पण त्यावर राजकारण करणं हे त्याहून लज्जास्पद असल्याचं अमित शाह यांनी म्हटले. तर सरकार हे मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचं अमित शाह यांनी सांगितले. मात्र विरोधकांना ही चर्चा व्हायला नकोय असा दावा देखील त्यांनी केला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक चर्चा होऊ देत नाहीत, असा आरोप अमित शाह यांनी विरोधकांवर केला. यावेळी गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने मणिपूरमध्ये केलेल्या कामांविषयी देखील माहिती दिली.

Editorial
Next Story
Related News
X
