Pratahkal - Marathi News Update - Pawar played the match
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय भूकंप ही शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, या सर्व सत्तासंघर्षावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब काहीही म्हणो, हे नेते पाठवल्याशिवाय जाणार नाहीत, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवार यांनी ३० आमदारांसह शिंदे (Shinde) - फडणवीस (Fadnavis) सरकारसोबत हातमिळवणी केली आहे. राष्ट्रवादीतील फूट आणि अजित पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात गेल्या दोन-अडीच वर्षापासून जे राजकारण सुरु आहे, ते दिवसेंदिवस किळसवाणं होत चाललंल आहे. या कोणलाही मतदारांनी काहीही देणं-घेणं नाही. कोणत्याही पक्षाचे कट्टर मतदार ते त्या पक्षाचे का मतदार होते, याचा सर्वांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल ती तडजोड करायची ही महाराष्ट्रामध्ये पेव फुटली आहे."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पवार साहेब कितीही काहीही म्हणत असले की, त्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. तरी, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे नेते असेच पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही."
मला असं वाटतं लोकांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही दिवसात मेळावा आणि बैठक घेणार आहे. मला महाराष्ट्राशी बोलायचं आहे. लवकरच पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दौरा सुरु होईल. त्यावेळी जागोजागी जाऊन लोकांना भेटेन.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आपण हा सगळा ड्रामा पाहत आहोत. याची सुरुवात पहाटेच्या शपथ विधीने झाली, मग शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी झालं, आता शत्रू कोण आणि मित्र कोण याचं काही महाराष्ट्रात राहिलंच नाही. मी मेळावा घेऊन त्यावेळी बऱ्याच गोष्टी बोलेन."
दरम्यान, अजित पवार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेच्या साथ घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून ही इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Editorial

Editorial

Next Story