Pratahkal - Marathi News Update - Congress means looted shops, untruthful market

सिकर : मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणावरून लोकसभेत (Loksabha) अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मात्र सभागृहाच्या बाहेरच विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आज राजस्थानमधील सिकर येथे जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी काँग्रेस (Congress) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'आता बास झाले, राजस्थान ही शूरवीरांची भूमी आहे. राजस्थानी लोक याचना करणारे नाही, तर रणांगणात गर्जना करणारे आहेत. त्यामुळेच राज्यात एकच गर्जना यावेळी ऐकू येणार आहे. ती म्हणजे, 'बहन, बेटियोंपर अत्याचार, नही सहेगा राजस्थान, अशी आक्रमक भूमिका पंतप्रधान मोदी यांनी मांडली.
दलितांवरील अत्याचार कर्जबाजारी झालेला शेतकरी, पेपरफुटीचे प्रकरण आणि राज्यातील भ्रष्टाचार यांच्या विरोधातही पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारची घोषणा दिली. यासह पंतप्रधान मोदींनी लाल डायरीचाही विषय काढला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा (Rajendra Singh Gudha) यांनी लाल डायरीच्या विषयावरून मुख्यमंत्री गहलोत यांच्यावर टीका केली होती. याचाच संदर्भ घेऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, 'काँग्रेस म्हणजे लुटीची दुकानं, असत्याचा बाजार आणि या लुटीच्या दुकानातील नवीन माल आहे ती, लाल डायरी. '
माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून विधानसभेतच गहलोत सरकारवर टीका केल्यानंतर त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली. हकालपट्टी झाल्यानंतर राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीचा मुद्दा पुढे केला. या डायरीमध्ये मुख्यमंत्री गहलोत यांच्या काळ्या कामांची यादी असल्याचा आरोप राजेंद्र सिंह गुढा यांनी केला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी धर्मेंद्र राठोड यांच्या घरावर २०२० साली प्राप्तीकर खात्याने धाड टाकल्यानंतर गुढा यांनी त्या ठिकाणाहून ही यादी मिळवली होती, असा दावा गुढा यांनी केला होता.
Editorial

Editorial

Next Story