Pratahkal - Marathi News Update - Former Chief Minister of Kerala Ooman Chandy passed away
केरळ : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते ओमान चांडी (Omen Chandi) यांचे मंगळवारी निधन झाले. ओमान चांडी यांच्या मुलाने पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन (Death) झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे (Social Media) दिली आहे. चांडी यांच्या पश्चात पत्नी मरियम्मा ओम्मान, मुलगा चांडी ओम्मान आणि मुली मारिया आणि अचू असा परिवार आहे.
काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमान चांडी हे ७९ वर्षांचे होते. २००४ ते २००६ आणि २०११ ते २०१६ या कालावधीत ते केरळचे मुख्यमंत्री होते. तसेच २००६ ते २०११ या कालावधीत त्यांनी केरळचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले. राहुल गांधींसह ते भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते.
ओमान चांडी हे मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ओमान चांडी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगळुरुत उपचार सुरु होते. २०१९ पासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना घशाचा आजारही जडला होता. उपचारांसाठी त्यांना जर्मनीतही नेण्यात आले होते.
केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनीही ट्वीट करत ओमान चांडी यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला. प्रेमाच्या बळावर जग जिंकणाऱ्या राजाच्या कथेचा शेवट झाला, या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. तसेच आपल्याला याबाबत खूप दुःख झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ओमान चांडी हे कोट्टायम जिल्ह्यातील पुथुपल्लीमधून निवडणूक लढवत असत. त्यांनी सलग १२ वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. ओमान चांडी हे जनतेमध्ये लोकप्रिय असणारे नेते होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यक्रमांद्वारे शेकडो लोकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यात आले.
Editorial

Editorial

Next Story