Pratahkal - News Update - Devendra Fadnavis will remove the hurdles in erecting a memorial for Chhatrapati Shivaji Maharaj in the Arabian Sea
बीड : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे. उच्च न्यायालयात पर्यावरण पूरक काम करून शिवस्मारक पूर्ण करण्यात येईल, अशी बाजू सरकारतर्फे पटवून देण्यात येईल. स्व. विनायक मेटे यांचे शिवस्मारक उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज व्यक्त केला.
बीड येथे आयोजित स्व. विनायकराव मेटे यांच्या प्रथम जयंती कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम स्व. विनायकराव मेटे यांच्या स्मृती स्थळास भेट दिली व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री अतुल सावे, खासदार प्रताप चिखलीकर, आमदार नमिता मुंदडा, आमदार संदिप क्षीरसागर, आमदार भारती लव्हेकर, माजी मंत्री महादेव जानकर, प्रविण दरेकर, शिवसंग्रामच्या डॉ. ज्योतीताई मेटे, आशुतोष मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिलेला लढा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी स्व. विनायकराव मेटे यांनी केलेले प्रयत्न बहुमोल आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विनायक मेटे काम करत होते. मराठा समाजातील गरीब व दुर्बल लोकांसाठी ते झटले. त्यांच्या प्रयत्नामुळे सारथी या शासकीय संस्थेच्या उभारणीत योगदान आहे. विद्यार्थ्यांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू होते. या सारथी संस्थेच्या माध्यमातून १०३ विद्यार्थी मोठे यश संपादन करत त्यांची महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. त्यांच्या कार्याला पूर्ण करताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असा पुनर्उच्चार उपमुख्यमंत्री महोदयांनी केला. बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्यात येणार असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी तेथे स्व. विनायक मेटे पुतळा उभारण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Editorial

Editorial

Next Story