Bachchu kadu
अमरावती : एकीकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागला आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ (Cabinet) विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. २० ते २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू म्हणाले. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. ते अमरावती येथे बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बहुमत होतं. त्यांनी कागदोपत्री यशस्वी लढा जिंकला. व्यवस्थित नियोजन केलं. त्यांना सगळ्यांचं पाठबळ आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालवर दिली. 'आता मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नसावी. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. लोकांची कामे निकाली निघावीत यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. माझ्या कानावर आलंय की २० किंवा २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि गरजेचं पण आहे. आमच्यासाठी नाही तर जनतेसाठी फार महत्त्वाचं आहे. एकेका मंत्र्याला पाच ते सहा पालकमंत्रिपद आणि तर खाती दिल्याने लोकांची म्हणावी तशी कामं होत नाहीत. कोणाला मंत्री बनवतात हा नंतरचा भाग पण विस्तार होणं महत्त्वाचं आहे. आता विस्तार झाला नाही तर मग २०२४ नंतरच विस्तार होईल असं मला वाटतं. ' महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं. परंतु तुम्हाला आता मंत्रिपद मिळणार का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे का, असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले की, 'मी मुख्यमंत्र्यांना बोललो नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे ते आपला शब्द पूर्ण करतील.'
Editorial

Editorial

Next Story