ST
मुंबई : शासनाने एसटी (ST) प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने आठवड्याभरात राज्यभरातून ७६ लाखापेक्षा जास्त महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून धावणाऱ्या एसटीमधील महिला प्रवाशांची (Women passengers) संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सोयीसाठी एसटी महामंडळ (ST Corporation) लवकरच रेल्वे, बेस्टप्रमाणे महिला स्पेशल (Women's Special) एसटी चालविण्याचा निर्णय घेऊ शकते अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती.
राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट (Bus ticket) दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीपासून या सवलतीचा पुरेपूर उपयोग करताना राज्यातील महिला दिसून येत आहेत. या हाफ तिकीट योजनेला फुल्ल प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. १७ मार्च ते २३ मार्च २०२३ पर्यत राज्यभरातून ७६ लाख ३ हजार २२ महिला प्रवाशांनी प्रवास केला आहे. ज्यामधून एसटी महामंडळाला १९ कोटी ९७ लाख रुपये महसूल मिळाला आहे.
Editorial

Editorial

Next Story