✕
कोरोनानंतर आता इन्फ्लुएंझाचे तांडव?
By EditorialPublished on
देशात व्हायरल फ्लूच्या (Viral Flu) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इन्फ्लुएंझामुळे (Influenza) रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचे आवाहन केले जात आहे.

x

नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) : देशात व्हायरल फ्लूच्या (Viral Flu) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इन्फ्लुएंझामुळे (Influenza) रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचे आवाहन केले जात आहे.
दिल्ली एम्सचे (Delhi AIIMS) माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी नागरिकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. रणदिप गुलेरिया यांनी इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड (Covid) उपायांचा अबलंब करण्यास सांगितले आहे. यावेळी मास्क (Mask), लस (Vaccine) आणि सॅनिटायझेशन (Sanitization) ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
इन्फ्लुएंझा हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदलेला प्रकार आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे (National Covid Task Force) नेतृत्व केले. त्यांनी सांगितलं की, नागरिक कोविड उपायांचं पालन करु आणि लसीकरण करु शकतात. नागपूर (Nagpur) येथे अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (एएमएस) तर्फे आयोजित परिषदेत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, मास्क वापरण्याची गरज आहे, कोविडप्रमाणे पसरणारा संसर्ग आहे. हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे. मधुमेह तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, दुसरा पर्याय म्हणजे उच्च जोखीम असणाऱ्या रुग्णांना वेगळं ठेवणं. वृद्ध आणि इतर आजारी लोकांना वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार आणि त्यांचं निरीक्षण करणे गरजेचं आहे. तसेच फ्लूवरील लस घेणं हा एक उपाय आहे. इन्फ्लूएंझा जॅब दरवर्षी नवीन लसीच्या स्वरुपात येतो आणि या लसीमध्ये इन्फ्लूएंझा ए आणि बी आणि त्यांचे उपप्रकार देखील समाविष्ट आहेत.
पुण्यात आढळले H3N2 चे २२ रुग्ण
देशभर हातपाय पसरू लागलेल्या H3N2 व्हायरस ने आता पुणेकरांना (Pune) धडकी भरवली आहे, पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहे. तर देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
इन्फ्लुएंझा विषाणूचा उपप्रकार असलेल्या 'H3N2' या विषाणूचे ('H3N2' Virus) सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं (National Institute of Virology) दिला आहे. या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसची लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे. त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
