✕
राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार
By EditorialPublished on
शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिक्षकांवर कोणतीही बंधने टाकणार नाही आणि टाकू देणार नाही.

x

वेंगुर्ले, दि. १६ (वार्ताहर ) : शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिक्षकांवर कोणतीही बंधने टाकणार नाही आणि टाकू देणार नाही. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरुजनांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच समिती बरोबर एक बैठक घेऊन सगळ्यात प्रश्नाबाबत चर्चा करू असेही त्यांनी सांगितले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी आमदार राजन तेली, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शिक्षक हे भावी पिढीला आकार देण्याचं, संस्कारित करण्याचं अतिशय मोलाचं काम करत असतात. शिक्षकांचे समाजामध्ये मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांवर जास्त बंधने लादली जाणार नाहीत. शासनाने गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थी या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे निर्णय शासनाने घेतले आहेत ते निर्णय हे राज्याचे हित लक्षात घेऊनच घेतले आहेत. सर्व सामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यातील घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिला जाईल. इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण हे भविष्य काळातील सुवर्णसंधी आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने देखील केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिशादर्शक काम करुन सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. तसेच केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल तसेच विचारांचे आदान-प्रदान होईल. त्यामुळे आपण या महाधिवेशनातून काहीतरी चांगले घेऊन जाल. जसे डॉक्टर जीवदान देतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे काम करत आहेत. मला शिक्षकांबद्दल खूप आदर आहे. शिक्षकांचे समाजामध्ये फार मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम आपण करत आहात. डॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरून शाळेत लवकर पोहोचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने केली जाणार नाहीत.

Editorial
Next Story
Related News
X
