Raj Thackeray

पुणे, दि. २८ (वार्ताहर ) : राजकारण वाईट नसून ते नासवलं जात आहे. सध्या राजकारणाला फाटे फुटत आहेत. आयुष्यात काहीही घडत नाही म्हणून राजकारणात यायचे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. ते बदलणे तुमच्याच हातात आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आज सहजीवन व्याख्यान मालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर आयोजित व्याख्यानात तरुण पिढीला राजकारणात येण्यासाठी आवाहन केले.
राज ठाकरे यांनी यावेळी समाजकारणाला राजकारणाची धार हवी असते त्याशिवाय बदल घडत नाही हे पटवून देताना राज्यातील तरुण शेतकऱ्यांना राजकारणात आणणारच असे विधान केले. 'राज्यात अनेक तरुण उत्तम काम करत आहेत. नवनव्या गोष्टी शोधून काढत आहेत. माझी भेट घेऊन प्रेझेंटेशन देत असतात. अनेक जण शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी काम करत आहेत. शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी काम करणाऱ्या तरुणांना मला राजकारणात आणायचे आहे. मी त्यांना राजकारणात आणणारच', असे राज ठाकरे म्हणाले. राजकारणात यायचे म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असे नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपले योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केले. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी राजकारणाचा सध्या विचका झाला असून सध्याची तरुणाई राजकारणाला तुच्छ मानू लागली आहे. पण प्रत्येकाचे आयुष्य हे राजकारणाशी जोडले गेलेले आहे. तुम्हाला सकाळी उठल्यापासून लागणारे दूध, पाणी, पेपर किंवा इतर सर्व सुखसोयी राजकारणी आणि प्रशासन ठरवत असते. त्यामुळे नव्या पिढीने राजकारणात येणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच राज्याच्या विधानसभेत सध्या सुरू असलेला गदारोळ आणि भाषणांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. 'विधानसभेतील भाषणं आता ऐकवतच नाहीत. त्यांनी बाहेरही येऊ नये असं वाटतं. कारण ते बाहेर आल्यानंतरही प्रसारमाध्यमांसमोर बरळतात', असे राज ठाकरे म्हणाले.
Editorial

Editorial

Next Story