वर्धा में सूखे से फसलें बर्बाद, सरपंच संगठन ने 100% फसल बीमा क्लेम मांगा
वर्धा को सूखाग्रस्त घोषित करने के बाद सरपंच संगठन ने बिना शर्त फसल बीमा भुगतान की मांग की, मांग न मानने पर आंदोलन की चेतावनी दी।
समुद्रपूर येथे अधिकाऱ्याला निवेदन सोपवताना सरपंच संघटनेचे पदाधिकारी.
दुष्काळाच्या झळांनी पिके होरपळून गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही निकषाशिवाय १०० टक्के पीक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसात ३० टक्क्यांची घट झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असल्याने विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता संपूर्ण पीक विम्याची भरपाई द्यावी, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समुद्रपूर येथे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन पाठविण्यात आले. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तातडीने १०० टक्के भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ, अशा परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. या संकटांतून पिके वाचली, तरी त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. मागील वर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. आता कोरड्या दुष्काळाने संपूर्ण पिके होरपळून गेली आहेत.
वर्धा जिल्हा पूर्णतः दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील शेतीपिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. शेतातून कोणतेही पीक हाती येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचीही भीषण समस्या निर्माण झाली आहे. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने येथील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत मिळणारच आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे, त्यांना विमा कंपनीने कोणतेही निकष न लावता १०० टक्के पीक विम्याची रक्कम द्यावी. दुष्काळ जाहीर झाला असून शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई विनाअट देण्यात यावी, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे.
मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरपंच संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विलास नवघरे, जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर चौधरी, वर्धा तालुकाध्यक्ष कीर्ती सवाई, जगदीश संचारीया, संजय नेहारे, दामिनी ताई डेकाटे, ज्योतीताई घंगारे, स्वप्नील खवशी, संदीप ढोबले, सतीश तागडे, राजेश शिरगरे, जगदीश वडतकर, उत्तम घुमडे आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.